पुणे - आषाढी एकादशी अवघ्या १२ दिवसांवर आली असून पंढरीच्या वारीचा फिव्हर आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. प्रशासनानेही वारकऱ्यांच्या सेवेसाठी तयारी केली असून १० लाख वारकऱ्यांचा मेळा पंढरीत दाखल होत आहे. अद्याप पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली वारकरी मजल-दरमजल करत पायी वारी करत आहेत. विविध ठिकाणाहून पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. या पालख्यांसोबत विठु-नामाचा गजर करत वारकरी विठ्ठल भक्तीत तल्लीन होऊन पाऊले टाकत आहेत. राज्याच्या माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही आज वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होत पायी वारीचा आनंद घेतला.
पंढरीची वारी ही आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा असून ते आपले वैभव आहे. सांस्कृतिक अमूल्य ठेवा आहे. राज्याच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. आज जेजुरी ते वाल्हे यादरम्यान वारीमध्ये सहभागी होण्याचा सुंदर योग माझ्या वाट्याला आला. यावेळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दर्शन घेतले. विठूनामाचा गजर करीत भक्तीत रममान झाले, असे वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. वर्षा गायकवाड यांनी श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत सहभागी झाल्याचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले आहेत.
सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी, त्यांच्या न्याय-हक्कांसाठी लढण्याची ताकद आणि प्रेरणा मला मिळो. त्याचप्रमाणे शेतकरी-कष्टकरी, गोरगरीब, वंचितांना सुगीचे दिवस येवो, गुन्हेगारी कुप्रवृत्तींचा समूळ उच्चाटन होवो, रोजगाराची नांदी होवो, घरोघरी सुख-समृद्धी, यश, शांती, समाधान नांदो. महाराष्ट्र व देशाचे आर्थिक चक्र वेगाने फिरावे अशी प्रार्थना आपण केल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय.
‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’
खरोखरंच आजच्या क्षणाचे सोबती होण्याचे भाग्य मला लाभले याचा फार आनंद आहे. हा विलक्षण सोहळा आता मी माझ्या स्मृतीत साठवून ठेवलेला आहे. या वारीत सहभागी तमाम माझ्या वारकरी बांधवांना, भगिनींना मी शुभेच्छा देते, असेही आमदार गायकवाड यांनी म्हटलंय.
II बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव II