Pandharpur Wari : यंदाही पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी घेणार बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 09:52 PM2021-05-25T21:52:20+5:302021-05-25T21:53:07+5:30
गतवर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला.
पुणे : पंढरीच्या सावळया विठूरायाच्या भेटीसाठी शेकडो वर्षापासून निघणारी पालखी सोहळ्यावर यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असून, या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार येत्या शुक्रवारी बैठक घेण्यात आहे. या बैठकीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्राची अध्यात्मिक परंपरा असलेला पालखी सोहळा दरवर्षी नित्यनेमाने आळंदी आणि देहू मधून पंढरपूर कडे प्रस्थान ठेवतो. वीस दिवसांच्या काळात वाटेवरच प्रत्येक गाव टाळ,मृदूंग आणि अभंगात तल्लीन होते. पंढरपूरात पोहचल्यानंतर आषाढी एकादशी चा सोहळा साजरा होतो. परंतु गत वर्षी कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक पालखी सोहळा रद्द करण्यात आला. कोरोनामुळे गेल्या वर्षभरातील सर्वच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. यंदा देखील संपूर्ण राज्यावर कोरोनाच्या दुस-या लाटेचे गंभीर संकट उभे आहे. या पार्श्वभूमीवर यंदा देखील सार्वजनिक पालखी सोहळा रद्द होणार किंवा कसे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार बैठक घेणार आहेत.
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अन्य जिल्ह्यात परिस्थिती अद्याप ही गंभीरच आहे. सध्या संपूर्ण राज्यात लाॅकडाऊन देखील आहे. त्यात सर्वच यंत्रणेकडून कोरोनाची तिसरी लाट यापेक्षा अधिक गंभीर असल्याचे इशारे दिले जात आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करता यंदा पालखी सोहळ्याचे स्वरुप काय असेल याचा आढाव घेण्यासाठी उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी दिली.