पळसदेव : महाराष्ट्र ही संतांची ‘पंढरी’ म्हणून ओळखली जाते. वर्षातून दोन वेळा म्हणजे, आषाढी व कार्तिकी अशी वारी असते; मात्र आषाढी वारीत मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरकडे जातात. आषाढी वारी म्हणजे भक्तांची मांदियाळी. अनेक पालख्या, दिंड्या, पंढरपूरकडे जातात. वर्षातून एकदा तरी पायी चालत जाऊन विठूरायाचे दर्शन व्हावे, ही अनेकांची मनोकामना असते. त्यातूनच आषाढी वारीसाठी जाणाऱ्या पालख्या, दिंड्या यामध्ये युवक, वयोवृद्ध नागरिक, महिला, सहभागी होतात. यामधे अपंग, दोन्ही पाय नसलेले वृद्ध नागरिकही सहभागी झाले आहेत. असाच एक ‘अवलिया’ आहे. केडगाव (ता. दौंड) येथील. त्यांचे नाव आहे प्रकाश शंकर नेवसे (वय ६७) वयाच्या २० व्या वर्षी अपघात होऊन रेल्वेखाली पाय गेल्याने दोन्ही पाय तुटले. असे ते सांगत असताना अंगावर काटा येतो.गुरुवारी सकाळी ते संत चौरंगी नाथमहाराज यांच्या पालखीतून ते तीनचाकी सायकलद्वारे पंढरीच्या वाटेने निघाले आहेत. त्यांना सायकल चालवायला लागणारी कसरत, गुडघ्यापासून नसलेले दोन्ही पाय हे चित्र मात्र प्रत्येकाचे मन हेलावून टाकते. भादलवाडी येथे पालखी सोहळा थांबला असताना त्यांची ‘लोकमत प्रतिनिधी’ने भेट घेतली. मी जिल्हा परिषदमध्ये ३० वर्षे पार्ट टाईम म्हणून नोकरी केली आहे. मात्र, रेल्वे अपघातात दोन्ही पाय गेले.त्याच वेळेस आपले आयुष्य संपले असे वाटत होते; मात्र माझी पत्नी, मुलांनी मोठा धीर दिला. गेली चार वर्षे मी रेल्वे प्रवास करून पंढरीची वारी करत आहे.विठू माऊलीची ऊर्जायावर्षी मात्र सायकलद्वारे वारीला सुरुवात केली आहे. आगामी काळात ही अशीच वारी सुरू ठेवणार असल्याचा निश्चयही त्यांनी बोलून दाखवला. पंढरपूरच्या विठ्ठलानेच मला ऊर्जा दिली असे ते सांगतात. दोन्ही पाय नसलेल्या या अवलियाची विठ्ठल भेटीसाठी लागे जीवा ही धडपड वारकºयांसाठी कौतुकास्पद ठरत आहे.
पंढरीची ओढ : पाय गमावूनही सुरू आहे ‘वारी’,
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:54 AM