Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 10:14 PM2021-06-04T22:14:21+5:302021-06-04T22:14:33+5:30

यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे..

Pandharpur Wari: Pandharpur wari decision will be taken by the Chief Minister after 'this' report | Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

Pandharpur Wari : वारकरी पायी वारीवर ठाम! पण मुख्यमंत्री 'या' अहवालानंतर घेणार निर्णय अंतिम

Next

पुणे : यंदाच्या वर्षी देखील आषाढी पायी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे संकट आहे. मात्र, वारकरी संप्रदायाला राज्य सरकार या परिस्थितीतून नक्की मार्ग काढेल अशी आशा आहे. याच धर्तीवर यंदा पायी वारीला राज्य सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी आळंदी आणि देहू पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. तर पवारांनी सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त यांच्याशी चर्चा करून व कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ३ ते ४ दिवसांत रिपोर्ट देणार असून तो मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर पालखी सोहळ्याबाबत ते अंतिम निर्णय घेतील असे अजित पवारांनी यावेळी सांगितले. 

पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर वारकऱ्यांशी चर्चा केली.पवार म्हणाले, वारकऱ्यांना समजावायचा प्रयत्न केला. पण त्यांनी वारीबाबत वेगळा विचार करा अशी मागणी केली आहे.तसेच ते म्हणतात, ५० लोक जाणार आहोत. पण पालखी पुढे पुढे जात असताना लोक दर्शनाला एकत्र येणारच आहे ना. परंतु,आता नियुक्त समितीचा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना दाखवणार असून ते वारीबाबत अंतिम भूमिका घेतील. 

यंदा २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून १ जुलैला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.

... सरकार सांगेल ती संख्या ,नियम संप्रदाय पालन करेल : अभय टिळक
राज्य सरकारने यंदा पायी वारीची मुभा द्यावी अशी मागणी आळंदी आणि देहू पालखी सोहळा प्रमुख अभय टिळक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली आहे. तसेच कोरोना कमी झाला तर ५०० जणांना परवानगी द्यावी. कोरोना कमी झाला नाही तर २०० जणांना द्यावी. अगदीच स्थिती बिघडली तर १०० जणांना परवानगी द्यावी, असे ३ पर्याय सरकार पुढं ठेवले आहेत अशी माहिती अभय टिळक यांनी दिली. तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून ती सर्वांशी चर्चा करून अहवाल देणार आहे. मात्र, १४ जूनला मुक्ताई पालखी प्रस्थान यामुळे १० जूनपर्यंत निर्णय घ्यावा असेही त्यांनी यावेळी सांगितले. 


कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.

Web Title: Pandharpur Wari: Pandharpur wari decision will be taken by the Chief Minister after 'this' report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.