केडगाव : येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संस्थेच्या संस्थापिका रमाबाई यांची रविवार, दिनांक २३ एप्रिल रोजी १५९ वी जयंती साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर, लवकरच मिशन परिसरात पंडिता रमाबाई शैक्षणिक विद्यापीठ साकारणार असल्याची माहिती मिशनचे कार्याधिकारी अनिल फ्रान्सिस यांनी दिली.या विद्यापीठाचे भूमीपूजन नुकतेच बोरीपार्धीच्या सरपंच संगीता ताडगे यांचे हस्ते झाले. यावेळी बोरीपार्धीचे उपसरपंच रघुनाथ सरगर, सुनील सोडनवर, मिशनचे मुख्याधिकारी लोरेन फ्रान्सिस, चेअरमन नितीन जोसेफ, कार्याधिकारी अनिल फ्रान्सिस, प्रशासक विक्रम जाधव, प्रशांत भोसले, मुख्याध्यापिका प्रमिला डोंगरे, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी फ्रान्सिस म्हणाले, पंडिता, सरस्वती आणि कैसर-ए-हिंद या बहुमानांनी सन्मानित रमाबाई यांना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीबद्दल ओळखले जाते. संस्कृतसह इंग्रजी, हिब्रू, ग्रीकसारख्या अनेक भाषांवर प्रभुत्व, व्यासंग आणि वाङमय, किंडरगार्टन (के.जी.)ची सुरुवात, अंधांकरिता देवनागरी लिपीतील ब्रेल भाषेचा शोध, ज्यामुळे अंध मराठी, हिंदी सारख्या भाषा वाचू-लिहू शकतात.संपूर्ण बायबलचे मूळ भाषेतून मराठीत भाषांतर अशा त्यांच्या अद्वितीय कार्याने त्या सर्वश्रुत आहेत. सध्या या ठिकाणी मुलींची ज्युनिअरपर्यंत शिक्षण मिळत आहे. विद्यापीठामुळे माहिती व ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील.प्रशासक विक्रम जाधव म्हणाले, की प्रशासनाने प्रास्तावित विद्यापीठासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता दिल्ली येथे केली आहे. मान्यता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच येथे सुसज्ज संकुल उभे राहणार आहे. अनेक अनाथ मुलींसाठी शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. (वार्ताहर)
साकारणार पंडिता रमाबाई विद्यापीठ
By admin | Published: April 23, 2017 4:11 AM