पुणे : मागील अनेक वर्षांपासून पुण्याची ओळख म्हणून असलेल्या झुणका-भाकर केंद्रात आता मटार-पनीरसारख्या पंजाबी भाज्या आणि रोट्याही मिळणार आहेत. मेट्रोच्या कामामुळे मंडईतील या केंद्राची स्थलांतर करण्यात येत असून सन १९७२ पासून या जागेत सुरू झालेला झुणका-भाकर आणि ठेच्याचा ठसका शनिवारी थांबला. मंडई येथीलच वाहनतळाच्या जागेत हे केंद्र तात्पुरते म्हणून हलवण्यात आले असून तिथे नवे पदार्थही देण्यात येणार आहेत.महापालिकेच्या जागेत अखिल मंडई मंडळाकडून श्रमिका, कष्टकरीवर्गाला स्वस्त दरात जेवण मिळावे, म्हणून हे केंद्र सुरू करण्यात आले. मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अप्पा थोरात यांनी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या वाढदिवशी त्यांना भेट म्हणून केंद्र सुरू केले. त्यावेळी दुष्काळ पडला होता व कष्टकरी जनतेची उपासमार होऊ नये, असा उद्देश त्यामागे होता. तेव्हापासून अखंडपणे सुरू असलेल्या या केंद्रातील चुलीवर शनिवारी अखेरच्या भाकºया तयार केल्या गेल्या. त्यासाठी केंद्र सुरू झाले तेव्हापासून तिथे जेवणासाठी म्हणून येत असलेल्या माऊली या मंडईतीलच श्रमिकाला खास बोलावण्यात आले होते. त्यांच्याबरोबरच आनंद सराफ, अॅड. मंदार जोशी, मेट्रोचे भूसंपादन अधिकारी भिवाजी पराड तसेच मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अण्णा थोरात म्हणाले, की मेट्रोचे भूमिगत स्थानक या परिसरात येत आहे. त्याच्या कामाला सुरुवात झाली असून त्यामुळे हे केंद्र पुढील चौकातील महापालिकेच्या वाहनतळात स्थलांतरित होत आहे. या नव्या केंद्रांमध्ये सध्याच्या बदललेल्या रुचीनुसार मटार-पनीर, तसेच अन्य काही पंजाबी भाज्या, तसेच मसाला डोसासारखे पदार्थही ठेवण्यात येणार आहेत. पालिकेने मंडळाला केंद्रासाठी म्हणून ९९ वर्षांच्या कराराने जागा दिली होती...................मेट्रो, महापालिका यांनी मंडळाला विनंती केल्याप्रमाणे मंडळाने ही जागा मेट्रोला देऊ केली आहे. मेट्रोची शहराला असलेली गरज लक्षात घेऊन मंडळाने यासाठी कोणत्याही व्यवहाराची किंवा लेखी करार वगैरेची मागणी केलेली नाही. ...........मेट्रो स्थानकाचे काम झाल्यानंतर वरील बाजूस तयार होणारी जागा प्राधान्यक्रमाने आम्हाला देण्यात यावी, तिथे असेच केंद्रे सुरू करण्यात येईल, या भागातील कष्टकरीवर्गाची ती आवश्यक गरज आहे. नव्या केंद्रातील कोणत्याही जेवणाची किंवा खाण्याच्या पदार्थाची किंमत २० रुपयांपेक्षा जास्त होणार नाही, यासाठी मंडळ दक्ष असेल, असे थोरात यांनी सांगितले.
झुणका-भाकर केंद्रामध्ये आता मिळणार मटार-पनीरही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 2:45 PM
मागील अनेक वर्षांपासून पुण्याची ओळख म्हणून असलेल्या झुणका-भाकर केंद्रात आता मटार-पनीरसारख्या पंजाबी भाज्या आणि रोट्याही मिळणार आहेत...
ठळक मुद्देअखिल मंडई मंडळाकडून श्रमिका, कष्टकरीवर्गाला स्वस्त दरात जेवण मिळावे, म्हणून हे केंद्र सुरू