दीपक होमकर
पुणे : सातारा-मुंबई महामार्गावरील नवले पुलावर सातत्याने अपघात होतात. त्याची कारणे शोधण्यासाठी आणि त्यावर उपाय करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमली गेली होती. त्या समितीने अभ्यास करून काही उपाययोजना सुचविल्या होत्या, त्या योजना महामार्ग प्राधिकरणाकडून पूर्णही केल्या; तरीही रविवारी भीषण अपघात झाला. यावरून समिती सपशेल नापास झाल्याचे स्पष्ट आहे.
सहा महिन्यांपूर्वी नवले पुलावर सलग सहा दिवस दररोज मोठे अपघात झाले. त्यानंतर या पुलाजवळील अपघातांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली होती. तिने अपघात रोखण्यासाठी काही किरकोळ उपाय सुचविले होते. त्यात प्रामुख्याने वाहनांची वेगमर्यादा कमी करण्यासाठीचेच अधिक उपाय दिले होते.
समितीच्या शिफारशीनुसार, वाहनांचा वेग केवळ ६० असावा. त्यासाठी ठिकठिकाणी वेगमर्यादा सांगणारे फलक लावावेत, वेग मोजणारा कॅमेरा बसवावा, रात्रीच्या वेळीही चालकांना स्पष्ट दिसावे, यासाठी पथदिवे लावावेत, अशा प्रमुख उपाययोजना सुचविल्या होत्या. या सर्वच योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पूर्ण केल्या होत्या.
...तरीही अपघात
या महामार्गावर स्वामीनारायण मंदिरापासूनच पथदिवे बसविले आहेत. त्यामुळे रात्रीही या महामार्गावर लख्ख प्रकाश असतो, तरीसुध्दा ८० टक्के अपघात रात्रीच्याच वेळी होत आहेत. हेदेखील आकडेवारीतून पुढे आले आहे.
नऊ हजार वाहनांवर कारवाई; एक कोटीचा दंड वसूल
समितीने सुचविल्यानुसार या महामार्गावर वेगनियंत्रक कॅमेरा लावण्यात आला हाेता. त्यामुळे ताशी ६० पेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या वाहनांची नोंद या कॅमेराने केली. त्या नंबरवरून वाहनमालकांवर दंडात्मक कारवाईही केली गेली. यात १ जानेवारीपासून २१ नोव्हेंबरपर्यंत ९ हजार ५८८ वाहनांवर वेगमर्यादा भंग केल्याप्रकरणी दंड आकारला असून, त्यापोटी तब्बल एक कोटी ९६ लाख १५०० रुपयांंचा महसूल शासनाकडे जमा झाला आहे.
वित्तहानीचा आकडा कोटीत
या रस्त्यावर २०१८ पासून २१ नोव्हेंबरपर्यंत १०८ अपघात झाले असून, त्यामध्ये चाळीस जणांचा मृत्यू झाला, अशी नोंद प्रशासनाकडे आहे. वास्तविक इतर छोटे-मोठे अपघात नोंदवलेच नाही. अशा अपघातांची संख्याही शेकडोंवर आहे. त्यामध्ये झालेल्या वित्तहानीचा आकडाही कोटींच्या घरात पोहोचणारा आहे.