केशवनगर गाव चार वर्षांपूर्वी महानगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे. केशवनगर परिसर हा सहा वाॅर्डांचा बनलेला आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून अखंड केशवनगर परिसराचा पाण्याला दाब कमी झाल्याने पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. आता नागरिकांना करंगळीएवढेही दाबाने पाणी मिळत नाही. पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. वेळेवर पाणी सोडले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. काही ठिकाणी तर पाण्याच्या लाईनला मोटर लावल्याशिवाय पाणीच मिळत नाही. तर काही ठिकाणी पाणीच येत नसल्याने पाणी विकत घ्यावे लागत आहे अशी अवस्था केशवनगरवासीयांची झालेली आहे.
नागरिकांच्या प्रतिक्रीया
काशीनाथ चव्हाण- वाॅर्ड क्र. ३ मध्ये ३ इंच व्यासाची पाईपलाईन आहे. त्यात जवळपास ७५ कनेक्शन आहेत. बरीचशी कनेक्शन बेकायदेशीर आहेत. त्यामुळे आम्हाला पाणीच मिळत नाही. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना संपर्क केला असता ते दखल घेत नाही. करू, बघू अशी उत्तरे देतात.
रोहिणी कालेकर- वाॅर्ड क्र.६ मध्ये २५ ते ३० मिनिटे पाणी मध्यरात्रीच्याच वेळेला सोडले जाते. त्यामुळे आम्हाला पाण्यासाठी रात्रभर जागावे लागते. येथील बिल्डरांच्या सोसायट्यांना पाणी सोडतात. पण आम्हाला पाणी सोडत नाही. पाणी येते ते पण कमी दाबानेच. त्यामुळे टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
प्रियांका झगडे- वाॅर्ड क्र.२ मध्ये मोटार लावूनही करंगळीसारखे पाणी येते. सुरुवातीला गढूळ पाणी येते. प्यायला दोन हंडेही पाणी मिळत नाही. आमच्या तक्रारींची दखलही घेतली जात नाही. नळाला पाणी येण्यास खूप वाट पाहावी लागते.
माधवी नाईक- वॉर्ड क्र.५ मध्ये पाणी कमी दाबाने येते. पाणी आले नाही तर वारंवार वॉलमनला संपर्क साधला लागतो. आम्ही इतरांकडून ६०० रुपये देऊन पाणी विकत घेत आहे. वॉलमन म्हणतात तुमच्या नळातच प्रॉब्लेम आहे. पाणी एक तासभरच सोडा, पण पूर्ण क्षमतेने सोडा, अशी आमची मागणी आहे.
-----------चौकट-------
केशवनगर भरते १२ ते १५ कोटींचा मिळकतकर......तरीपण पाणी का मिळत नाही
केशवनगर गाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यामुळे येथे मिळकतदार वाढीव दराने मिळकतकर भरीत आहे. केशवनगरमध्ये साधारण १५ हजार मिळकतदार आहेत. त्यांचा अंदाजे १२ ते १५ कोटींचा मिळकतकर महानगरपालिकेला जमा होतो. त्यातील निवासी मिळकतींना २५ टक्के व बिगरनिवासी मिळकतींना ४० टक्के पाणीपट्टी आकारली जाते. याचाच अर्थ असा की, साधारण ३ कोटींच्या आसपास केशवनगरमधून पाणीपट्टी आकारली जाते. तरीसुद्धा केशवनगरच्या एक लाखांच्या आसपास असलेल्या लोकसंख्येला दिवसाआड ४५ मिनिटेच पाणी का मिळते.