पुणे : तडीपारीची कारवाई केल्यानंतरही मध्य वस्तीत दहशत पसरविण्याचे काम सुरुच असल्याने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सराईत गुन्हेगारावर एम पी डी ए कायद्यान्वये कारवाई करुन त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
योगेश मारुती गायकवाड (वय २५, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न करे, मारामारी करणे, घातक हत्यारे जवळ बाळगणे, जबरी चोरी करणे, धमकी देणे, महिलांना छेडणे, सामान्य नागिरकांना मारहाण करणे यासारखे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. गायकवाड याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी २०१९ मध्ये त्याला १ वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत काही एक सुधारणा झालेली नव्हती.
योगेश गायकवाड हा तेथील व्यापारी व बांधकाम व्यावसायिकांना खंडणी मागणे, नागरिकांना विनाकारण त्रास देणे अशी कृत्ये सातत्याने करीत आहे. त्याच्या कृत्यामुळे नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली असून तक्रारीसाठी कोणी पुढे येत नाही. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी त्याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना सादर केला होता. या प्रस्तावाची पडताळणी करुन गुप्ता यांनी त्याला मंजूरी दिली. खडक पोलिसांनी योगेश गायकवाड याला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे. गेल्या वर्षभरात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आतापर्यंत ३३ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यान्ये स्थानबद्ध केले आहे.