पुणे : पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत वाढत चालली असून, त्यामुळे या बिबट्यांचे करायचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथील एका १९ वर्षीय तरुणीवर बिबट्याने बुधवारी (दि. १२) हल्ला केला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यामुळे तेथील ग्रामस्थ चांगलेच संतापले आहेत. या बिबट्यांचे काही तरी करा, अशी त्यांची मागणी आहे; परंतु, राज्य सरकारने बिबट्यांसाठी खास धोरण करण्याची गरज आहे, तरच हे हल्ले कमी होऊ शकतील. तसेच पुणे शहर परिसरातही बिबटे येऊ लागले आहेत.
पूर्वी भीमाशंकर व जुन्नर परिसरातील बिबट्यांचा अधिवास होता. तो आता बदलला असून, तेथून बिबट्यांनी जिल्ह्यात सर्वत्र हक्क दाखवायला सुरुवात केली आहे. कारण, सर्वत्र उसाची शेती वाढत असल्याने त्यामध्ये त्यांना पोषक वातावरण मिळते. परिणामी, मादी बिबट दोन- तीन बछड्यांना जन्म देत आहे. ते बछडे मोठे झाले की, इतर ठिकाणी पसरतात आणि मग वन्यजीव- बिबट संघर्ष निर्माण होतो. यावर उपाय एकच असून बिबट्यांसाठी ठोस धोरण तयार करावे लागणार आहे. ते धोरण तयार करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी माजी वनाधिकारी प्रभाकर कुकडोलकर यांनी सातत्याने केली आहे. राज्य सरकारला यावर आता योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा लागणार आहे. अन्यथा, बिबट्यांचा धुमाकूळ आणि ग्रामस्थांचा संताप वाढतच जाईल.
ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर पडू नये
शेतामध्ये घरे बांधलेली असतात. त्यामुळे आजुबाजूला उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असते. त्या शेतीत बिबटे राहतात आणि दबा धरून बसतात. सावज दिसले की त्यावर झडप घालतात. त्यामुळे ग्रामस्थांनी रात्री घराबाहेर पडू नये, हातात काठी घेऊन आवाज करत घराबाहेर पडावे, याबाबत खूप जनजागृती झालेली आहे. तरी देखील हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
आता ठोस धोरण करण्याची गरज
बिबट्यांचा निश्चित असा अधिवास ठरवावा. त्याच्या बाहेर जर बिबटे दिसले तर त्यांचा योग्य तो बंदोबस्त व्हावा. बिबटे सर्वत्र पसरले आहेत. त्यामुळे किती बिबट्यांना पिंजरा लावून पकडणार आणि त्यांना कुठे ठेवणार? त्यामुळे आता ठोस धोरण करण्याची गरज आहे.
''वनविभागाने कायमस्वरूपी जनजागृतीसाठी एक वाहन सुरू करावे. रेस्क्यूच्या वाहनांना रोज काही काम नसते. ती वाहने दररोज जनजागृती करतील, अशा प्रकारे नियोजन करावे. बिबट प्रवण क्षेत्रातील शाळांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये जाऊन काय काळजी घ्यावी, ती माहिती सातत्याने द्यावी, असे कुकडोलकर यांनी सांगितले.''