या वेळी ग्रामस्थ, विविध पक्षातील पदाधिकारी व देवसंस्थान कर्मचाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत व भंडाऱ्याच्या उधळणीत निकुडे पाटील यांच्या निवडीचे स्वागत केले. २०१८ साली विभागीय धर्मादाय आयुक्त पुणे यांनी देवसंस्थान समितीच्या न्यासावर ७ विश्वस्तांची नियुक्ती केली होती. या वेळी प्रत्येक विश्वस्ताला ९ महिन्यांचा कालावधी अध्यक्षपदाचा देण्यात आला होता. विश्वस्त प्रसाद शिंदे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने शनिवारी (दि. २४) देवसंस्थान समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये विश्वस्त पंकज निकुडे-पाटील यांची प्रमुख विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी मावळते प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे, विश्वस्त राजकुमार लोढा, शिवराज झगडे, अशोकराव संकपाळ, तुषार सहाणे, संदीप जगताप, पदसिद्ध विश्वस्त तथा नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे उपस्थित होते.
निवडीनंतर पंकज निकुडे म्हणाले की, जेजुरी तीर्थक्षेत्र व खंडोबा गडाच्या विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. प्रशासनामार्फत सुरू होणाऱ्या या कामांना प्राधान्य देणार असून लवकरात लवकर विकासकामे सुरू करताना मानकरी, खांदेकरी, ग्रामस्थांना विश्वासात घेणार आहे. पहिला टप्पा १०८ कोटी रुपयांचा असून लवकरच खंडोबा गडकोट, मुख्य मंदिर, पायरीमार्ग यांच्या जतन, संवर्धन व दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाला करणार आहोत.
२४ जेजुरी
प्रमुख विश्वस्तपदी पंकज निकुडे-पाटील यांची नियुक्ती करताना विश्वस्त व मान्यवर.