पिंपरी : राष्ट्रवादीचे नेते आझम पानसरे भाजपावासी झाल्याने त्यांच्या समर्थकांची सध्या तळ्यात-मळ्यात अशी स्थिती झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात पानसरे यांच्या समर्थक नगरसेवकांचा गट आहे. पानसरे यांच्या भरवशावर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची समर्थकांनी जोरदार तयारी केलेली आहे. मात्र, अचानक त्यांनी भाजपाात प्रवेश केल्यामुळे त्यांची कोंडी झाली आहे. ज्या प्रभागात भाजपाचे देखील इच्छुक उमेदवार आहेत, त्याच ठिकाणी पानसरे यांचेही समर्थक इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, पानसरे यांच्या पाठोपाठ भाजपात प्रवेश केल्यास भाजपाची उमेदवारी मिळणार का, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे थांबणे अथवा पानसरे यांच्याबरोबर जाणे यांपैकी काय फायद्याचे ठरेल, अशा द्विधा मन:स्थितीत समर्थक आहेत. जगदीश शेट्टी, ज्ञानेश्वर भालेराव, नीलेश पांढरकर, जावेद शेख, नंदा ताकवणे, तानाजी खाडे, अस्लम शेख, उल्हास शेट्टी, काळुराम पवार हे पानसरे समर्थक मानले जातात. पानसरे यांच्या प्रवेशापाठोपाठ समर्थकांपैकी काही जणांनी लगेच भाजपाात प्रवेशही केला. मात्र, काही जणांचा विचार सुरू असून, त्यांची तळ्यात-मळ्यात अशी स्थिती आहे. लवकरच आचारसंहिता लागू होणार असून, विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारनिश्चितीची प्रक्रिया सुरूआहे. अनेक इच्छुकांनी तर प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दरम्यान, पानसरे यांच्या भाजपाा प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलली असून, पानसरे समर्थकांना ऐनवेळी धावाधाव करावी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी उद्योगाच्या महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार संबंधित समस्या सोडविण्यासाठी भाजपाामध्ये प्रवेश केल्याची भूमिका मांडली आहे. या समस्यांचे निवारण करण्यासाठी पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून तसेच केंद्र सरकार संदर्भातील समस्यांसाठी केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन स्थानिक भाजपा नेतृत्वाने दिले असल्याचे बेलसरे यांनी म्हटले आहे.
पानसरे समर्थक गोंधळात
By admin | Published: January 11, 2017 3:12 AM