पुणे : पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत. या विलंबामुळे मनस्ताप सहन करावा लागत असल्याने ही गाडी वेळेत सोडता येत नसेल तर पनवेलपर्यंतचा विस्तार रद्द करावा, अशी मागणीही प्रवासी करू लागले आहेत. दौंड वरून सकाळी ७.०५वाजता सुटणारी दौंड-पुणे पॅसेंजर गाडी पुण्यात सकाळी ८.४५ वाजता पोहोचते. या गाडीचा दि. २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत केला आहे. पुण्यातून सकाळी ९.०५ वाजता निघून दुपारी १.४० वाजता पनवेल स्थानकात पोहचते. त्यानंतर पनवेल वरून दुपारी २.४० वाजता पुण्यासाठी रवाना होते आणि सायंकाळी ६.१० वाजता पोहोचते. हीच गाडी पुण्यातून सायंकाळी ६.४५ वाजता बारामतीला सोडली जाते. पॅसेंजरचा विस्तार पनवेलपर्यंत केला तेव्हापासून आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस किमान एक ते दीड तास उशिरा सुटते. यामुळे दैनंदिन पुणे ते दौंड-बारामती प्रवास करणारे लोणी, मांजरी, उरुळी, यावत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या मार्गावर या गाडी शिवाय इतर कोणती ही गाडी थांबत नाही. ही गाडी वेळेत धावणार नसेल तर तिचा विस्तार रद्द करावा अशी मागणी दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे यांनी केली आहे. दरम्यान, पनवेल येथून गाडी सुटल्यानंतर खंडाळ्याचा घाट चढण्यासाठी कर्जत येथे गाडीच्या पाठीमाग इंजिन जोडण्यात येते. हे इंजिन जोडण्यास सुमारे तासभर लागतो. त्यानंतर १५-२० मिनिटांनी गाडी सुटते. त्यामुळे पुण्यात येण्यास गाडीला विलंब होत आहे. या गाडीसाठी अनेक प्रवासी थांबून असतात. पण गाडी वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे या पॅसेंजरचे दोन रेक करून एक रेक पुण्यात थांबवून वेळेत बारामतीला सोडण्यात यावा, असे रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.
पनवेल-बारामती पॅसेंजरची ‘लेट’ सवारी : प्रवाशांना सहन करावा लागतोय मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 7:19 PM
पनवेलपर्यंत विस्तार केलेली बारामती-पुणे पॅसेंजर सातत्याने किमान एक ते दीड तास उशिरा धावत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या आहेत.
ठळक मुद्देलोणी, मांजरी, उरुळी, यवत, खुतबाव, केडगाव, कडेठाण आणि पाटस या भागातील प्रवाशांचे अतोनात हाल