स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळात महाराष्ट्राला लाभलेलं प्रतिभासंपन्न राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणजे बॅरिस्टर नाथ पै. कोकणातील वेंगुर्ले गावात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पंढरीनाथ पै यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची झलक अल्पवयातच दिसून आली. ते पुढे कायद्याचे निष्णात पंडित बनले. त्यांना महत्त्वाकांक्षा व चांगल्या-वाईटाची पारख लहान वयातच कशी होती, हे अधोरेखित करणारा हा प्रसंग.
नाथ पै एकपाठी होते. कोणत्याही गोष्टीचं आकलन त्यांना पटकन होई, पण शाळेत असताना त्यांचा गणित विषय कच्चा होता. गणितात वारंवार चुका होत. एकदा असंच गणित चुकलं म्हणून पंढरीनाथांना शिक्षकांचा खरपूस मार खावा लागला. नाथाने घरात या गोष्टीची वाच्यता केली नाही, मात्र हाता पायांवरील काळेनिळे डाग पाहून गुरुजींनी केलेली शिक्षा घरात सर्वांना समजली. नाथ घरातील शेंडेफळ असल्याने सर्वांनाच खूप वाईट वाटलं. नाथांचा वडीलभाऊ तर संतापलाच. दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन गुरुजींना जाब विचारायचा, असं त्याने ठरवूनही टाकलं. नाथाला हे समजताच रात्री जेवणाच्या वेळी ते सर्वांना उद्देशून म्हणाले, "माझ्या हितासाठीच गुरुजींनी मला शिक्षा केली. माझा गणित हा कच्चा विषय सुधारावा, असं गुरुजींना मनापासून वाटतं. तुम्ही शाळेत येऊन त्यांना जाब विचारल्यास यापुढे गुरुजी मला शिक्षा करणार नाहीत. माझ्याकडे दुर्लक्ष करतील. त्यामुळे नुकसान माझंच होईल. घरातील मंडळी मला पाठीशी घालतात, असा समज होऊन स्वतःतील दोष दूर करण्यापेक्षा मी त्यांचं समर्थनच करायला लागेन. त्यामुळे कृपया गुरुजींच्या या शिक्षेकडे सर्वांनी दुर्लक्ष करावं."
गुरुजींच्या शिक्षेमुळे आपल्यातच सुधारणा होणार आहे, अशी लहान वयातच असलेली पंढरीनाथ यांची समज त्यांच्या कणखर मानसिकतेची साक्ष देणारी आहे. या वृत्तीमुळेच भविष्यात नाथ पै यांनी स्वतःमधील कच्च्या दुव्यांवर मात करीत प्रतिभासंपन्न नेता म्हणून लौकिक कमावला.
- प्रसाद भडसावळे