अनंत हरी गद्रे हे लोकसंग्राहक व समर्पित वृत्तीचे समाजसेवक होते. नाटककार, पत्रकार, जाहिरातदार अशी कामातील विविधता असूनही त्यांची खरी ओळख समाजहितकारी व्यक्तिमत्त्व अशीच होती. लोकमान्य टिळकांच्या विचारांनी प्रभावित होऊन गद्रे स्वदेशी चळवळीतील एक स्वयंसेवक बनले. पुण्याच्या जोगेश्वरी मंदिरासमोर सौगंधिक स्टोअरच्या माध्यमातून त्यांनी दुकानही चालवले. लोकमान्यांच्या अनेक दौन्यांमध्ये ते सहभागी असत. दुकानातील फावल्या वेळात ते दौऱ्याची वार्तापत्रे लिहीत. यातूनच ते पत्रकारिता करू लागले. जाज्वल्य देशाभिमानातून त्यांनी ‘स्वराज्य सुंदरी’, ‘माझा देश’, ‘वीरकुमारी’, ‘भवानी तलवार’सारखी तत्कालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी नाटके लिहिली. त्या काळचा संगीत नाटकप्रेमी नकळत या राष्ट्रभक्तीने प्रेरित नाटकांनी भारावून गेला. टिळकांच्या निधनानंतर गद्रे मुंबईत गेले. हैदराबाद मुक्तिसंग्रामात १९३९मध्ये सहभागी होऊन ‘भागनगर’ सत्याग्रहात तुरुंगवासही भोगला. दरम्यान, समाजातील जातपात तोडक विचारांमुळे ते उद्विग्न झाले. यातूनच अस्पृश्यता निवारण कार्याचा प्रारंभ झाला. सर्व जाती-जमातींनी उच्चनीचता विसरून एका व्यासपीठावर यावे एवढे मर्यादित विचार न ठेवता, अनंतरावांनी कल्पक उपक्रम सुरू केले. त्यापैकीच एक म्हणजे ‘झुणका भाकर सत्यनारायण’. या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे तो हरिजन दाम्पत्याने करणे अपेक्षित असे. यात कर्मकांडाचा बडेजाव नसे. सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून साजूक तुपातला शिरा न ठेवता गद्रे यांनी गोरगरिबांना परवडेल असा ‘झुणका भाकरी’चा प्रसाद सुरू केला. अशा एक हजार आठ झुणका-भाकर सत्यनारायणांची मोहीम त्यांनी हाती घेतली. आपले नावही ‘समतानंद गद्रे’ ठेवले. त्यांच्या झुणका भाकर सत्यनारायणाचे कौतुक संत गाडगेमहाराजांनी जाहीरपणे केले. अन्यायाविरुद्ध झोकून काम करणारे निष्ठावान समाजसेवक अनंत गद्रे शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिले.
- प्रसाद भडसावळे