यानंतर एका रविवारी पूना क्लबवर मित्रत्वाचा होणारा सामना पाहायला गर्दी होती. कारण सर्वांना त्यांचा खेळ पाहायचा होता. संघाचे कर्णधार होते प्रिन्सिपॉल एन. डी. नगरवाला. सामना सुरू होण्यापूर्वी सर्वांनी अर्धा तास आधी पोचायचे, असा नगरवाला यांचा दंडक होता. हा खेळाडू नेहमीप्रमाणे घरातून वेळेवर सायकलवरून निघाला. कॅम्पमधील लाल देवळाजवळ त्याची सायकल पंक्चर झाली. पंक्चर काढायला वेळ जाणार, हे लक्षात येताच आहे त्या अवस्थेत सायकल घेऊन तो धावत मैदानावर गेला. तोपर्यंत प्रिन्सिपॉल नगरवाला नाणेफेकीसाठी मैदानावर हजर होते. नाणेफेक करून ते परत आले व क्षेत्ररक्षणासाठी त्यांनी संघाला बोलाविले. आता तोही घाईघाईने मैदानावर हजर झाला, पण नगरवाला म्हणाले, “तू आज उशिरा आला आहेत. त्यामुळे तुला खेळता येणार नाही. आज स्कोअरिंगचे काम तू करायचेस."
'शिस्त सर्वांनाच सारखी'... हा नगरवाला यांचा ही शिक्षा करण्यामागचा उद्देश होता. तो मुलगा थोडा निराश झाला, पण सरांचा आदेश शिरसावंद्य मानून त्याने त्या दिवशी स्कोअरिंगचे काम केले. मात्र ही शिक्षा एक शिकवण मानून त्याने त्या दिवसापासून वेळेवर येणे ही आयुष्यभरासाठीची शिस्त म्हणून पाळली. हा खेळाडू म्हणजे चंदू बोर्डे, भारतीय कसोटी क्रिकेट संघातील महत्त्वाचा खेळाडू, ज्याला लोक प्रेमाने 'पँथर' म्हणून ओळखू लागले, तेही कायमचे!
- प्रसाद भडसावळे