रामकृष्ण अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांतून मार्गदर्शन करीत. त्यांचे शिष्य महेंद्रनाथ यांनी अनुभवलेला, आपल्या जीवनातील गुरूचे महत्त्व विशद करणारा हा एक प्रसंग.
एकदा नदीकाठच्या वृक्षाखाली रामकृष्ण शिष्यांसमवेत बसले असताना एकाने विचारले, “गुरुदेव, आपली उन्नती करून घेण्यास खरंच गुरूची आवश्यकता आहे का?" समोर नदीतून जात असलेल्या एका बोटीकडे अंगुलिनिर्देश करीत रामकृष्ण परमहंस म्हणाले, “ती नदीतून जाणारी बोट, चिनसुरा येथे केव्हा पोचेल?" "साधारण सायंकाळी सहा वाजेपर्यंत" शिष्य उत्तरला.
"त्या बोटीला पाठीमागे एखादी होडी जोडली तर ती त्या बोटीबरोबरच पोचेल; पण होडी एकटीच चालवण्यात आली तर ती केव्हा पोचेल?"
"बहुतेक उद्याची सकाळच उजाडेल होडी पोचायला," शिष्याने सांगितले.
त्यावर रामकृष्ण शांतपणे म्हणाले, “आपलेही असंच आहे. आपण स्वतःच प्रयत्न करायला लागलो तर आपली उन्नती होणारच नाही असे नाही; पण त्यासाठी फार काळ लागेल; पण उत्तम गुरूच्या सहवासाने ती लवकर होईल, इतकेच."
एका लहानशा उदाहरणावरून रामकृष्णांनी आयुष्यातील गुरूचे महत्त्व विशद केले.
- प्रसाद भडसावळे