महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन असणाऱ्या महाबळेश्वरला सध्या दिवाळीची चाहूल लागली असून, दिवाळी हंगामासाठी दुकाने तसेच हॉटेलांच्या साफ-सफाईची कामे पूर्ण करण्याची व्यापारी व व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे.महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. बारमाही हंगाम असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. पावसाळ्यात मात्र पर्यटकांची संख्या अत्यल्प असते.तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी पावसाचा परिणाम दुकाने व इमारतींवर नेहमीच होत असतो. पर्यटकांचा पावसाळी हंगाम नकुतान संपला असून, दिवाळी हंगाम सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिक तसेच मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. दुकानात पकडलेली बुरशी काढण्याबरोबरच कोळशाच्या धुरामुळे खराब झालेल्या भिंतींना व दुकानांना रंगरंगोटी करण्यासाठी सध्या स्थानिक व्यापारी व व्यावसायिकांची लगबग सुरू झाली आहे.सर्वत्र रंगकाम सुरू असल्याने व्यावसायिकांना कर्मचाऱ्यांची वानवा भासत आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांतून पुणे, मेढा, सातारा अशा ठिकाणांहून रंग कर्मचाऱ्यांची मागणी होत आहे.महाबळेश्वरची खासियत असणाऱ्या स्ट्रॉबेरीपासून ते जाम, जेली, चिक्की, चने तसेच चपला, कपडे, शोभेच्या वस्तू अशा एकापेक्षा एक वस्तूंना पर्यटकांतून मोठी मागणी असल्याने दिवाळीमध्ये या वस्तूंनी बाजारपेठ फुलणार आहे. (प्रतिनिधी)‘पॉइंट’चे दर्शन लवकरचमहाबळेश्वरला असणारे विविध पॉइंट महाबळेश्वरच्या पर्यटनाचा मुख्य केंद्रबिंदू आहेत. येथे येणारे पर्यटक पॉइंटला मोठ्या संख्येने भेट देतात.हे पॉइंट पावसाळा सुरू होताच बंद केले जातात व पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पाहण्यासाठी खुले केले जातात.दिवाळी हंगाम जवळ आल्याने सर्व पॉइंट पर्यटकांना पाहण्यासाठी लवकरच खुले करण्यात येणार आहे.
दिवाळी हंगामासाठी ‘नंदनवन’ नटले
By admin | Published: October 05, 2014 9:33 PM