पुणे - सोशल मीडियावर मोठा प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांची निवड करण्यात आली आहे. ट्विटरचे (Twitter) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, ते लवकरच पराग यांच्याकडे कंपनीची कमान सोपवतील, अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबई आयआयटीचा विद्यार्थी असलेल्या पराग यांचे देशभरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
स्पेस एक्स, टेस्ला आणि स्टारलिंकसारख्या बड्या कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनीही पराग यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. तसेच भारतीयांच्या प्रतिभेचा, कौशल्याचा अमेरिकेला खूप फायदा होत असल्याचे म्हटले आहे. स्ट्रीप कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक कॉलिसन यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले असून, त्यावर एलन मस्क यांनी रिप्लाय करत पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.
आताच्या घडीला गुगल, मायक्रोसॉफ्ट, एडॉब, आयबीएम, पालो ऑल्ट नेटवर्क्स आणि आता ट्विटर या कंपन्या चालवणारे मुख्य कार्यकारी अधिकारी भारतात मोठे झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील भारतीयांचे अद्भूत यश वाखणण्याजोगे आहे आणि अमेरिकेने स्थलांतरितांना दिलेल्या उत्तम संधीची चांगली आठवण आहे, असे ट्विट पॅट्रिक कॉलिसन यांनी केले होते. पराग अग्रवाल यांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि अमेरिकेच्या वॉशिंग्टनपर्यंत अभिनंदन केलं आहे. मात्र, पुण्यातील मनसेचे नेते अनिल शिदोरे यांचं ट्विटही विचार करायला भाग पाडणारं आहे.
अनिल शिदोरे यांनी ट्विट करुन
जेव्हा आमच्या मराठवाड्यासारख्या भागातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेली एखादी मुलगी ट्विटर किंवा गुगलसारख्या कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकार होईल, तेव्हाच खरा आनंद.... असे ट्विट शिदोरे यांनी केलं आहे.
कोण आहेत पराग अग्रवाल
पराग अग्रवाल यांनी आयआयटी मुंबईमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स विषयात पीएचडी केली होती. AT&T, याहू आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम केल्यानंतर पराग यांनी २०११ मध्ये ट्विटरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम सुरू केले होते. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना ट्विटरमध्ये चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर पदी बढती देण्यात आली. ट्विटरच्या सीईओपदी नियुक्ती झाल्याबरोबर पराग अग्रवाल हे सिलिकॉन व्हॅलीमधील भारतीय वंशाच्या सीईओंच्या यादीत सामील झाले आहेत. ज्यांच्यामध्ये सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांचा समावेश आहे.