केडगाव : पारगाव (ता. दौंड) येथे सेंद्रिय शेती अभ्यासदौरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेंतर्गत परंपरागत कृषी विकास योजनाच्या (सेंद्रिय शेती) अनुषंगाने आयोजन केले होते. ‘आत्मा’चे दौंड तालुक्याचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांच्या मार्गदर्शनात पारगाव सा. मा. (दौंड) व नागरगाव (शिरूर) येथे हा अभ्यासदौरा आयोजित केला होता.
दौऱ्यात प्रगतशील शेतकरी वसुधा सरदार, ईश्वर वाघ यांच्या सेंद्रिय शेतीला भेट देण्यात आली. आंतरपीक पद्धती, देशी गाईंच्या शेण व गोमूत्राचा योग्य वापर, द्विदल वनस्पतीचा नत्र स्थिरीकरणासाठी वापर, टाकाऊ पदार्थांचा आच्छादनासाठी वापर व त्याचा पिकाला होणारा फायदा याबाबत माहिती देण्यात आली. ईश्वर वाघ यांच्या शेतात त्यांनी केलेला देशी गाईंचा आधुनिक गोठा, मुक्त संचार गोठा पद्धती, एकात्मिक कोंबडीपालन, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेला ऊस, गांडूळखत प्रकल्प या गोष्टी पाहायला मिळाल्या. वसुधा सरदार यांनी गांडूळ आपल्या जमिनीसाठी खूपच फायद्याचे आहेत. मातीचा सेंद्रिय कर्ब ४ टक्क्यांपर्यंत असेल तर गांडूळ एक एकर जमिनीमध्ये युरियाचा ७६ गोणी टाकल्यावर जेवढा नत्र उपलब्ध होईल तेवढा नत्र उपलब्ध करून देतात असे सांगितले. गांडूळ खताचे युनिट तयार करण्यापेक्षा शेतातच गांडूळांना लागणारे सेंद्रिय पदार्थ जसे की काडीकचरा, उसाचे पाचट गाडणे, भाजीपाल्याचा टाकाऊ पदार्थ, शेणस्लरी इत्यादींचा वापर केला पाहिजे असे सांगितले.