पुणे : भारतात पाच वर्षाखालील मुलांचे न्युमोनिया आणि अतिसारापासून संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेले प्रयत्न कमी पडत असल्याचे एका जागतिक अहवालावरून समोर आले आहे. तसेच लसीकरण तसेच इतर प्रतिबंधात्मक उपचारांमध्ये मुलगा व मुलगी असा दुजाभाव होत असल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे. न्युमोनिया अॅण्ड डायरिया प्रोग्रेस रिपोर्ट जॉन्स हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमधील इंटरनॅशनल वॅक्सिन अॅक्सेस सेंटरने (आयव्हीएसी) नुकताच हा अहवाल प्रसिध्द केला आहे. न्युमोनिया व अतिसार या आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या भारतासह १५ देशांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. मूल्यांकन केलेल्या १५ देशांपैकी आठ देश न्युमोनिया व डायरियापासून संरक्षण तसेच या आजारांवर उपचारांसाठी जागतिक आरोग्य संघटना तसेच युनिसेफच्या न्यूमोनिया व अतिसार प्रतिबंध व नियंत्रणासाठीच्या एकात्मिक जागतिक कृती योजनेने (जीएपीपीडी) घालून दिलेल्या १० उपायांची पूर्तता करण्यातच कमी पडत आहेत. स्तनपान, लसीकरण, वैद्यकीय सेवेची उपलब्धता, प्रतिजैवकांचा वापर, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) व झिंक देणे आदींचा उपायांचा त्यात समावेश होतो. २०१६ मध्ये जगभरात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू या दोन आजारांमुळे झाले होते. यावर्षी भारतात सर्वाधिक २ लाख ६० हजार ९९० मृत्यू झाले होते. त्यामध्ये १ लाख ५८ हजार १७६ मुलांचा न्युमोनियामुळे मृत्यू झाला होता. भारतात हिमोफिलिअल इन्फ्लुएंझा टाइप बी लशींची व्याप्ती वाढवून तसेच रोटाव्हायरस लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये आणलेले न्युमोकोकल काँज्युगेट वॅक्सिन (पीव्हीसी) सर्व राज्यांपर्यंत पोहोचवण्याचा विचार झाला पाहिजे. तसेच स्तनपानाबाबत तसेच ओआरएसच्या प्रसाराबाबत भारताचे गुण कमी झाले आहेत. केवळ २० टक्के मुलांना अतिसारासाठी ओआरएस उपचार मिळत असून एकूण मुलांना महत्त्वाचे उपचार मिळण्याचे प्रमाण खूपच कमी आहे, असे अहवालात नमुद करण्यात आले आहे.
देशात लसीकरण, प्रतिबंधनात्मक उपचारांमध्ये मुलींना दुजाभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 8:49 PM
न्युमोनिया व अतिसार या आजारांनी सर्वाधिक बालमृत्यू होणाऱ्या भारतासह १५ देशांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्देया दोन आजारांमुळे २०१६ मध्ये जगभरात पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू