----
वाल्हे : नवरात्रातील घटस्थापना अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, या काळातील लागणाऱ्या लाकडी बांबूच्या परडीची निर्मितीची कामे वाल्ह्यात अंतिम टप्प्यात असून, अनेक तयार झालेल्या परड्या पुण्यात विक्रीसाठी रवाना होत आहेत. वाल्हे भागात मागील दोन-अडीच महिन्यांपासून ''बुरुड'' समाजातील कारागीर परडी बनवण्यासाठी उद्योगात गुंतले आहेत.
याबाबत माहिती देताना परडी बनविणारे कारागीर शंकर सपकाळ म्हणाले की, सध्या पारंपरिक धंदे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मिळणारा कच्चा माल, त्यापासून बनवली जाणारी वस्तू, त्याला लागणारा वेळ व खर्च यांच्या खर्चाचा ताळमेळ बसत नाही. नरेंद्र सपकाळ म्हणाले की, वडिलोपार्जित पारंपरिक व्यवसाय करण्याची आवड असल्यामुळे हा व्यवसाय करतो आहे. यासाठी लागणारा कच्चा माल सातारा जिल्ह्यातील लोणंद येथून आणला जातो. सध्या बांबूंचा भाव वाढला असून, सव्वाशे ते दीडशे रुपये प्रतिनग असा आहे. बांबू वाहतुकीसाठी गाडी भाडे व त्यापासून बनवल्या जाणाऱ्या वस्तूंची किंमत याचा ताळमेळ बसत नाही. सध्या परडीचा ठोक भाव १५ रुपये ते १६ रुपये मिळत आहे.
घटस्थापनेला अजून दहा दिवस बाकी असून, अजून काही माल पाठविण्यात येणार असल्याची माहिती परडी कारागीर अशोक सपकाळ, नरेंद्र सपकाळ, गणेश सपकाळ, रूपेश साळुंखे, संतोष सपकाळ आदींनी दिली.