पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिरोदिया विधी महाविद्यालयात मुलाला प्रवेश मिळत नाही,याचा राग मनात धरून एका पालकाने महाविद्यालयातील प्राध्यापकाला व सोसायटीच्या नियामक मंडळाच्या सदस्याला मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली.पालकाने गोंधळ घालून व हाणामारी करून महाविद्यालयात गोंधळ घातल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
आपल्या मुलाला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी प्रत्येक पालक विविध पातळ्यांवर प्रयत्न करतो. मात्र, डीईएस विधी महाविद्यालयात तीन-चार दिवस फे-या मारूनही प्रवेश मिळत नसल्याने एका व्यक्तीने महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सुखदेव इंगळे आणि नियामक मंडळाचे सदस्य नितीन आपटे यांना मारहाण केली.त्यानंतर संस्थेतर्फे पोलीस आयुक्तालयात लेखी तक्रार करण्यात आली.या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नितीन आपटे म्हणाले,दुपारी दोन वाजता एका व्यक्तीने महाविद्यालयात येवून गोंधळ घालून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. शिविगाळ करून मला व प्राध्यापक इंगळे यांना मारहाण केली.स्वत:ला वकिल म्हणून घेत त्याने कायदा हातात घेतला.पोलिसांना फोन लावण्यास सांगितल्यानंतर तो तात्काळ महाविद्यालयाच्या आवारातून पसार झाला.मात्र,मी व इंगळे यांनी स्वाक्षरी करून पोलीस आयुक्तायात लेखी तक्रार दिली आहे.