पुणे : शुल्कवाढीसंदर्भात पालकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींवर विभागीय शुल्क नियंत्रण समिती सुनावणी घेणार आहे. दि. १५ व १६ मे रोजी ही सुनावणी होणार असून तक्रारदार पालक व सर्व संबंधित शाळांमधील पालक-शिक्षक संघ कार्यकारी समितीतील सदस्यांना उपस्थित राहता येणार आहे. त्यामुळे बेकायदेशीरपणे शुल्कवाढ रद्द होण्याची शक्यता आहे.शहरातील काही शाळांनी अवाजवी शुल्कवाढ केली आहे. याविरोधात मागील काही दिवसांपासून पालक सातत्याने आंदोलन करीत आहेत. शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे १९ शाळांनी बेकायदेशीर शुल्कवाढ केल्याबाबत पालकांनी तक्रारी केल्या आहेत. या शाळांना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नोटिसा देऊनही काही शाळांनी त्याची दखल घेतली नाही. तसेच शुल्क नियंत्रण कायद्यानुसार पालकांना विभागीय शुल्क नियंत्रण समितीकडे तक्रार करता येत नाही, असे अधिकारी सांगत आहेत. तर काही संघटनांनी पालक तक्रारी करू शकत असल्याचे म्हटले आहे. यावरून काही दिवसांपूर्वी पालक संघटना व अधिकाऱ्यांमध्ये वादावादीही झाली होती.आलेल्या तक्रारींबाबत कार्यवाही करण्यासाठी विभागीय शुल्क नियंत्रण समितीची बैठक दि. १५ व १६ मे रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीमध्ये पालकांनी केलेल्या तक्रारींवर सुनावणी होणार आहे. बैठकीत तक्रारदार पालक, सर्व संबंधित शाळांमधील कार्यकारी समिती सदस्य यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. तक्रारी आलेल्या बहुतेक शाळांची चौकशी पूर्ण झाली आहे. पालकांनी एकत्रितपणे केलेल्या तक्रारी समितीसमोर ठेवल्या जाणार असल्याचे टेमकर यांनी सांगितले.
पालकांच्या तक्रारींना अखेर मिळणार न्याय
By admin | Published: May 03, 2017 3:00 AM