पुणे : युगंधर ताजणे
पौर्णिमा आणि राजु ( नावे बदलली आहेत)हे एकाच गावातील. सुरुवातीला गावात येण्या - जाण्याच्या निमित्ताने एकमेकांशी ओळख झाली. दोन ते तीन वर्षापूर्वीच्या या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तेव्हा त्याने जबाबदारी झटकली. तोपर्यंत पौर्णिमाने एका मुलीला जन्म दिला होता. शेवटी राजुच्या आईवडिलांनी पुढाकार घेऊन मुलाची चुक पदरात घेत त्या दोघांचे लग्न लावून दिले. हे सगळे जुळवून आणण्यात बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांच्या समुपदेशनाचा वाटा महत्वपूर्ण होता.
दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणारी पौर्णिमा (वय 22) दोन महिन्यांपूर्वी पौर्णिमा बाल कल्याण समिती पुणे 1 च्या कार्यालयात आली तेव्हा तिच्या हातात नुक तेच काही दिवसांपूर्वी जन्मलेले तान्हुले बाळ होते. तिने तेथील पदाधिका-यांना आपली हकीकत ऐकवली. खेड्यातील मुलगी सुरुवातीला राजुच्या (वय 24) शब्दांवर, त्याने दिलेल्या वचनांवर भाळली. यातुन पुढे एकमेकांमध्ये प्रेम निर्माण झाले. त्यानिमित्ताने ’’एकत्र ’’आल्यावर पौर्णिमा गरोदर राहिले. हे राजुला कळताच त्याने तिला स्वीकारायचे टाळले. तो कारणे सांगुन जबाबदारी झटकु लागला. काहीही झाले तरी तिला स्वीकारायचे नाही असा त्याने निर्धार केला. पौर्णिमाच्या पायाखालची जमिन सरकली. अशावेळी जाणार कुठे, राहणार कुठे, समाज काय म्हणेल याची भीती असल्याने तिने बालकल्याण समितीचे दरवाजे ठोठावला. त्याठिकाणी काम करणा-या अध्यक्षा डॉ.महादेवी जाधववर- तांबडे, सदस्या सविता फटाले, बिना हिरेकर, अँड. ममता नंदनवार आणि अमित देशमुख यांची मोठी मदत झाली. त्यांनी सुरुवातीला मुलाला बोलावून घेऊन त्याचे समुपदेशन केले. गावातच छोटासा व्यवसाय करणा-या राजुने पौर्णिमेला स्वीकारण्याविषयी आढेवेढे घेतले. त्याला तिला सांभाळायचे नव्हते. त्याला त्या अपत्याची जबाबदारी आपल्या शिरावर घ्यायची नव्हती. त्याला विचार करुन निर्णय घेण्याकरिता दोन महिन्यांचा वेळ दिला. शेवटी राजुच्या आईला बोलविण्यात आले. तिला राजुने काय केले आहे याची पुसटशी देखील कल्पना नव्हती. प्रत्यक्षात काय झाले हे कळाल्यानंतर तिला धक्काच बसला. सदस्यांनी तिचे समुपदेशन केले. एकूण तिने सगळी परिस्थिती लक्षात घेऊन महत्वाचा निर्णय घेत पौर्णिमा आणि राजुचे लग्न लावून देत त्या मुलीचा स्वीकार केला. लग्नाला परवानगी दिली.
पौर्णिमेची आई या लग्नाला नाही म्हणत होती. तिला मुलीचे बाळंतपणात झालेल्या शाररीक परिस्थितीविषयी माहिती देण्यात आली. तिचे देखील समुपदेशन करण्यात आले. यानंतर तिचे मतपरिवर्तन झाले. जास्त फरफट न होता आता मुलीला हक्काचे घर मिळाले याविषयी तिने समाधान व्यक्त केले. राजु आणि पौर्णिमाच्या लग्नाला नुकतेच दोन महिने पूर्ण झाले. आळंदी येथे मोठ्या उत्साहात त्यांचा विवाह पार पडला.
- अध्यक्ष व बालकल्याण समितीचे सदस्य सांगतात की, एकीकडे लग्नापूर्वी झालेल्या शरीरसंबंधातून अपत्य झाल्यास ते जबाबदारीने स्वीकारण्याची मानसिकता संबंधित व्यक्तीमध्ये पाहवयास मिळत नाही. अशावेळी मुलींवर आभाळ कोसळते. त्यांच्यापाठीमागे हक्काने कुणीतरी उभे राहण्याची गरज असते. घरी कळल्यानंतर आई वडिलांची सुरुवातीची प्रतिक्रिया अत्यंत टोकाची असल्याने अतिशय शांत व संयमाने परिस्थिती हाताळावी लागते. प्रेमाचा भर ओसरल्यानंतर येणा-या वास्तवाला भिडण्याची ताकद तरुणांनी घेण्याची तयारी दाखविल्यास अशाप्रकारच्या घटना कमी होण्यास मदत होईल
- समितीमधील समुपदेशक सांगतात की, अशा प्रकारच्या घटना बालकल्याण समितीसमोर येत असून यात अनेकदा संबंधित व्यक्तीचा विचारातील एकसुरीपणा जाणवतो. आपण केलेल्या कृत्यावर तडजोडीतून एखादा सकारात्मक मार्ग शोधणे यापेक्षा ‘‘ दरवेळी लोक काय म्हणतील’’ याकडे त्यांचा अधिक भर असल्याचे दिसून येते. खासकरुन गरीब कुटूंबातून जिथे दोन वेळच्या खाण्याचा प्रश्न आहे अशा समुहातून याप्रकारच्या गंभीर समस्या समोर येत आहेत.