पुणे: राज्यात येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यावर आता शिक्षण विभागानेही सहमती दर्शवली आहे. पालकांच्या संमतीपत्राशिवाय मुलांना शाळेत जाता येणार नसल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यात शाळा सुरु होण्याच्या निर्णय झाला आहे. पण पालक, पालक संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. बाजारात लहान मुलांची लस आली नाही. तसेच नोव्हेंबरमध्ये लहान मुलांची लस येण्याची चिन्ह आहेत. तरी सरकार का घाई करत आहे. असा प्रश्न पालकांकडून विचारलं जात आहे. त्यातच प्रशासनानं पालकांचं संमतीपत्र मागितल्याने तेही गोंधळात असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यावरच अजित पवारांनी शाळांना खबरदारीचा सल्ला दिला आहे.
''येत्या ४ ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत असल्या तरी पालकांची अद्यापही आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याची मानसिकता नसल्याचे पवार यांनी सांगितले. त्यामुळं खबरदारी म्हणून सर्व शाळांनी कोविड नियमांचे काटेकोर नियोजन व अंमलबजावणी करावी असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.''
''सध्या पुण्यात हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण एक वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास संदर्भात नवरात्रीनंतर असलेली परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल. तसेच ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील पुन्हा सुरू करण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेत्यात येईल असंही पवार यांनी स्पष्ट केले.''
पुण्यात ७५ तास लसीकरण
पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सलग ३ दिवस आणि पुढे तीन तास असे ७५ तास लसीकरण केले जाणार आहे. तसंच, ग्रामीण भागात ही लसीकरण मोहिम सहा तालुक्यात घेण्यात येणार आहे. तर, पुणे शहरातील काही भागात लसीकरण होणार आहे, असंही अजित पवार यांनी सांगितले.
ससूनमध्ये 40 टक्के रुग्ण एकट्या नगरचे
पुण्यातील ससून रुग्णालयात सर्वाधिक जवळपास ४० टक्के रुग्ण एकट्या नगर जिल्ह्यातील आहेत. यात संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांतील सर्वाधिक रूग्ण आहेत. याबाबत नाशिक आणि नगर येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या भागावर अधिक लक्ष केंद्रित करून कडक उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना संबंधित अधिकारी यांना दिला आहेत.