एकीकडे ऑनलाइन शिक्षणातील अडथळे येत असताना दुसरीकडे मात्र संबंधित खासगी शिक्षण संस्था तथा इंग्लिश माध्यमातील शाळा विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ‘फी’ वसुलीसाठी तगादा लावत आहेत. तर आळंदीतील काही संस्थाचालक विद्यार्थ्यांची महत्त्वाची कागदपत्रे अडवून ‘फी’ वसुलीसाठी अडवणूक करत असल्याचे गंभीर महाराज अवचार यांनी सांगितले.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता शासनाने शालेय फीमध्ये सवलत दिली आहे. मात्र, ऑनलाइन शिक्षणातील अडचणींचा विचार करता अनेक पालकांची शालेय फी भरण्याची मानसिकता दिसून येत नाही. अशा परिस्थितीत फी वसुलीदरम्यान संस्थाचालक व पालकांमध्ये ‘तू तू - मै मे’च्या घटना घडून वाद निर्माण होऊ लागले आहेत. वास्तविक या प्रकारांमुळे खासगी शिक्षण संस्थाही आर्थिक अडचणीत सापडून डबघाईला येत असल्याची सत्यस्थिती समोर येत आहे. शासनाने कोरोनाची पार्श्वभूमी व ऑनलाइन शिक्षणातील अडथळे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची किमान ६० टक्के शैक्षणिक ‘फी’ माफ करून संबंधित शाळांना अनुदान देण्याची मागणी आळंदीतील पालकवर्गाकडून केली जात आहे.