शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

आई-वडील रोजंदारीवर, मुलगा ‘एमपीएससी’चा वारकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : येत्या १४ मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : येत्या १४ मार्चला होणाऱ्या महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी गेल्या अनेक महिन्यांपासून कष्ट घेत आहेत. मात्र ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची बातमी गुरुवारी (दि.११) पुढे आली आणि यातल्या अनेकांच्या डोळ्यासमोर काजवेच चमकले. कारण पुण्यासारख्या शहरात राहून एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांचे पालक गावाकडे रोजंदारी करून, मोलमजूरी करून त्यांना शिकवत आहेत.

परीक्षा रद्द झाल्याचे समजताच विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले त्यामागे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची वेदना मोठ्या प्रमाणात आहे. काय आहेत या विद्यार्थ्यांचे प्रश्न हे जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला.

पुण्यात गेल्या काही वर्षांत शेकडो अभ्यासिका उभ्या राहिल्या. प्रामुख्याने मध्यवस्तीतल्या, पेठांमधल्या या अभ्यासिका म्हणजे एक खोली आणि त्यात ओळीने मांडलेल्या टेबल-खुर्च्या. काही अभ्यासिकांमध्ये वायफाय ते लायब्ररीपर्यंतची सोय. पण प्रत्येक विद्यार्थ्याचे विश्व असते त्याची टेबल, खुर्चीच. दिवसातले जवळपास १० ते ११ तास विद्यार्थी या खुर्चीवर बसून असतात. कोणी पुस्तके वाचतो, कोणी कानाला हेडफोन लावून व्याख्याने ऐकतो... आणि यासाठी हे विद्यार्थी मोजतात महिन्याकाठी किमान आठशे ते दोन हजार रुपये. हा खर्च अनेक मुलांना परवडतही नाही.

दिवसभर याच अभ्यासिकेतला अभ्यास आणि रात्री नोकरी हे गेल्या २ वर्षांचे आशिष पवारचे ‘रूटिन’ आहे. २३ वर्षांचा आशिष पवार यवतमाळचा. त्याचे पालक मोलमजुरी करतात. त्यातून त्यांचा स्वत:चाच खर्च भागवताना त्यांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे पुण्यात राहायला आलेल्या आशिषला स्वत:चा खर्च स्वत: भागवावा लागतो. त्यासाठी दिवसभर अभ्यास आणि रात्री वाॅचमनची नोकरी करत तो महिन्याकाठी येणारा ८ ते १० हजारांची जुळणी कशीतरी करतो. पुस्तक खरेदी किंवा इतर काही खर्च आला की हे गणित कोलमडते.

आशिषने ‘लोकमत’ला सांगितले की, “एका खोलीत दहा-बारा जण राहतो. कष्टाने परीक्षेची तयारी करतो. पण दोन वर्षे परीक्षाच झाली नाही. काय करावे ते कळत नाही. घरच्यांना माहितीये की मुलगा परीक्षा द्यायला पुण्याला गेलाय. पण पुण्यात राहूनही मुलाला परीक्षा का देता आली नाही हे त्यांना कुठे माहीत आहे?”

आशिषसारखीच अवस्था नांदेडच्या २३ वर्षांच्या सम्यक कोकरेची. त्याच्या घरचेही मोलमजुरी करतात. सम्यक सांगतो, “मुलगा पुण्यात गेला म्हणजे त्याचे आयुष्य सुधारेल, परीक्षा झाली की त्याला सरकारी नोकरी लागेल, असे पालकांना वाटते. आई-वडील रोजंदारीवर जातात. त्या कमाईतून त्यांच्या पोटाची सोय होते. पोटाला चिमटा घेऊन माझ्यासाठी पैसे पाठवतात. एक वर्ष त्यांनी मदत केली. मग कोरोना आला. आता परीक्षाच नाही.” आता काय करावे, हे कोडे सम्यकला उलगडत नाही.

अशीच अवस्था कमी-अधिक फरकाने सगळ्याच विद्याथर्यांची. मग एवढे असून ‘एमपीएससी’चे आकर्षण का, असे विचारल्यावर कोल्हापूरचा एक विद्यार्थी म्हणाला, “घरची शेती आहे. शेतीमधली दुरवस्था बघितल्यानंतर शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. शिक्षण संपल्यावर नोकरी मिळेना म्हणून एमपीएससीकडे वळलो.” हजारो विद्यार्थ्यांची हीच कहाणी. कोणी २१ व्या वर्षी तयारी सुरू केली, कोणी २३ व्या. पण दोन-चार वर्षे अभ्यास करून परीक्षाच होईना. त्यामुळे हा सगळा वेळ, आई-वडलांचे कष्ट, वय, पैसा वाया जाणार का, ही चिंता हजारो विद्यार्थ्यांना सतावते आहे. या चिंतेचा उद्रेक झाला आणि विद्यार्थी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले.