पुणे: कोरोना काळात पालकांवर शुल्क जमा करणा-या शाळांवर कारवाई करावी,विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण थांबवू नये,शिक्षण शुल्क कायद्याचे उलंघन करणा-या शाळांवर फौजदारी कारवाई करावी,आदी मागणीसाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या कार्यालयासमोर तीन दिवसांपासून आंदोलन करणा-या पालकांची शनिवारी सुनावणी घेण्यास सुरूवात झाली.मात्र,काही संस्थाचालक सुनावणीदरम्यान कोणतीही बाजू न मांडताच निघून जात असल्याचे पाहून पालकांनी गोंधळ घातला.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाळांकडून आॅनलाईन शिक्षण दिले जात असताना पालकांना सर्व शुल्क भरण्यास सांगितले जात आहे.परंतु, शिक्षण विभागाकडून शाळांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पॅरेट्न्स असोसिएशनतर्फे 15 शाळांच्या पालकांनी प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर आंदोलन केले.तीन दिवस आंदोलन केल्यानंतर संचालक दत्तात्रय जगताप यांनी पालकांची सुनावणी घेण्यास सुरूवात केली.
पॅरेट्न्स असोसिएशनच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे म्हणाल्या, पालकांची आर्थिक पिळवणूक करणा-या शाळांवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने पालकांनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरू केले.त्यामुळे काही विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण पुन्हा सुरू होत आहे.परंतु,शिक्षण विभागाकडून कोणतेही कडक पाऊल उचलले जात नाही.त्यामुळे आठवड्याभरात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.