\Sलोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: राज्य शासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कोरोना ची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे आपल्या पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही,असा संभ्रम पालकांमध्ये आहे. परंतु,बहुतांश पालकांनी लस आल्याशिवाय पालकांना शाळेत पाठविणार नाही,अशी भूमिका घेतली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा येत्या २३ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. इयत्ता दहावी बारावीतील विद्यार्थ्यांचे काही पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मक आहेत.परंतु, बहुतांश पालक अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाही.मात्र, शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील शाळांची घंटा वाजविण्याची तयारी सुरु केली आहे.
ग्रामपंचायत, सामाजिक संस्था व शाळा निधीमधून शाळांचा परिसर निर्जंतुक केला जात आहे. सध्या जिल्ह्यातील समारे तीन हजार शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर पासूनच सर्व शाळा सुरू होतील, असे नाही तर शिक्षकांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील शाळा सुरू केल्या जातील.
-----------------
जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संख्या: ६ लाख ५० हजार
जिल्ह्यातील एकूण शिक्षकांची संख्या: २२ हजार
-------------
शाळा सुरू झाल्यानंतर वर्गामध्ये गणित ,विज्ञान, इंग्रजी विषय ऑफलाइन पद्धतीने शिकवले जाणार आहेत. शाळा घड्याळी तासाप्रमाणे तीन तास भरवली जाणार आहे.
--------
भाषा ,इतिहास ,सामाजिक शास्त्र आदी विषय विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकविले जातील.
-----------
लस आल्याशिवाय शाळा सुरु करणे योग्य नाही. सर्व विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षणच सुरू ठेवावे.मात्र,ऑनलाइन वर्गामध्ये केवळ २० विद्यार्थी असावेत. त्यामुळे शिक्षकांना या विद्यार्थ्यांकडे लक्ष देता येईल. तसेच विद्यार्थ्यांना आपल्या अडचणी शिक्षकांसमोर मांडता येतील.
- प्रदीप ठोंबरे, पालक
-----------------
आतापर्यंत जिल्ह्यातील तीन हजार शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यात दहा ते बारा शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शिक्षकांचे तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर १ डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होतील.- गणपत मोरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, पुणे