पुणे : शाळेत मित्र-मैत्रिणींबरोबर मस्ती...अभ्यास, मैदानी खेळ...एकत्र डबा खाण्यातली मजा ते स्क्रीनच्या चौकटीत बंद झालेले ऑनलाईन शिक्षण...दुरावलेले मित्र-मैत्रिणी आणि शाळा असा अत्यंत अवघड प्रवास मुले गेली दीड वर्ष अनुभवत आहेत. शिक्षणाच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप नसणे ही खूप मोठी बाब आहे. त्यातच पहिली ते पाचवीच्या मुलांची चार-पाच तास चालणारी शाळा अनेक समस्यांना आमंत्रण देत आहे. या काळात मुलांना सर्वांत जास्त गरज आहे ती पालकांच्या प्रेमळ आधाराची...त्यामुळे पालकांनी शिक्षक, पालक आणि मित्र अशा तिन्ही भूमिका वठवाव्यात, असा उपाय जाणकारांकडून सुचवला जात आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात झाली आहे. मात्र, नवीन युनिफॉर्म, नव्या पुस्तकांचा गंध, मित्र-मैत्रिणींची भेट या वातावरणाला मुले मागच्या वर्षीप्रमाणे यंदाही मुकली आहेत. ऑनलाईन शाळेचे चार-पाच तास, आठ विषयांचा अभ्यास यामुळे प्रचंड ताण निर्माण झाला आहे. एकीकडे वाढलेला स्क्रीन टाईम, तर दुसरीकडे ‘वर्क फ्रॉम होम’च्या मोडमधील पालकांकडे वेळेचा अभाव असा पेच निर्माण झाला आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका असल्याने तीही काळजी सतावत आहे. मुलांचे शारीरिक आणि मानसिक संतुलन योग्य राखण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद वाढवावा, अभ्यासाचा ताण कमी करण्यासाठी काही ॲक्टिव्हीटी कराव्यात, मुलांच्या आहार आणि व्यायामावर लक्ष द्यावे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
काय आहेत मुलांच्या अडचणी?
* ऑनलाईन लेक्चरची वेळ ३५ ते ४० मिनिटांची असते आणि एका वर्गात ३०-४० मुले असतात. त्यामुळे प्रत्येक अडचण ऑनलाईन क्लासमध्ये विचारणे शक्य होत नाही.
* नेटवर्क कनेक्शनच्या समस्येमुळे अडचण निर्माण होते.
* लहान घर असलेल्या मुलांना शाळा सुरू असताना एकात मिळू शकत नाही.
* चार-पाच तासांच्या वेळेत सहा-सात विषय शिकवले जात असल्याने ताण निर्माण होतो.
* आईवडील वर्क फ्रॉम होम करत असतील, घरात कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप नसेल तर मोबाईल कमी वेळेसाठी उपलब्ध होतो.
* जुळी मुले असतील आणि वेगवेगळ्या तुकडीत असतील तर पालकांचा त्रास आणखी वाढतो.
----
--------
लहान मुले यंदाचे संपूर्ण वर्ष घरीच असणार आहेत. मुलांच्या मानसिक विकासामध्ये हा दोन वर्षांचा काळ खूप महत्त्वाचा आहे. पालकांच्या किंवा शिक्षकांच्या लक्षात न येणारे बदल मुलांच्या भावविश्वात घडत आहेत. या काळात पालकांनी शिक्षक आणि मित्र होऊन मुलांचे भावविश्व समजून घ्यायला हवे. डिजिटल विश्वात मुले अडकून पडणार नाहीत, याची काळजी पालकांना घ्यावी लागेल.
- डॉ. संजय ललवाणी, बालरोगतज्ज्ञ
-----
ऑनलाईन शिक्षणाचे तास वगळता पालकांनी इतर वेळी मुलांना स्क्रीनपासून दूर ठेवावे. संकटाकडे संधी म्हणून पाहत मुलांना बैठे खेळ, हस्तकला, चित्रकला किंवा इतर एखादा आवडीचा छंद यामध्ये गुंतवून ठेवावे. या काळात संवादाचा पूल बांधला जाणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वांनी एकत्र बसून जुने फोटो पाहणे, एखादा पदार्थ करणे, बैठे खेळ खेळणे यातून हा पूल आपोआप बांधला जाऊ शकतो.
- निधी पाध्ये, समुपदेशक