पाषाण : प्रेमप्रकरणाविषयी भूमिका घेण्याअगोदर पालकांनी मुलांची बाजू समजून घेणे आवश्यक आहे. कुटुंबाने घेतलेल्या अगदी टोकाच्या निर्णयातून पाल्यांनी आयुष्य संपवले जाण्याच्या घटना समाजात वाढत आहे. ही समाजासाठी भूषणावह गोष्ट नाही. समाजातील जातीपातींचे निर्मूलन हे आंतरजातीय विवाहातूनच होवू शकते. तसेच आनंद कांबळे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. दिवंगत आनंद कांबळे यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय विद्यार्थी सन्मान व शालेय साहित्य वाटपप्रसंगी ते औंध येथील पंडित भीमसेन जोशी नाट्यगृह येथे बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, परशुराम वाडेकर, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका सुनिता वाडेकर, डॉ. वासुदेव गाडे, भूपेश धुलकर, नगरसेवक बंडू ढोरे, नगरसेवक विजय शेवाळे, नगरसेविका सोनाली लांडगे,मंदार जोशी आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले,सर्वसमाजाविषयी सुरक्षिततेची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. याप्रसंगी माजी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे म्हणाले, समाजासाठी स्वत:ला विसरून काम करण्याची आठवण जपली पाहिजे. समाजाच्या शंकास्पद वातावरणात आपण आपल्या लोकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यावेळी चारशेहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आले.
प्रेमप्रकरणात पालकांनी समजूतदारपणा दाखवावा : रामदास आठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 2:48 PM
प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्या,आत्महत्या रोखण्यासाठी आंतरजातीय विवाहांविषयी समाजात जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे.
ठळक मुद्देआनंद कांबळे यांच्या खुन्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे