- भानुदास पऱ्हाड
आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदी - देवाची परिसरात वातावरणातील बदलामुळे सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्रात आठवड्याभरात सुमारे १ हजार ७०० पेक्षा अधिक शाळकरी मुलांना या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. यापार्श्वभूमीवर तालुका आरोग्य प्रशासन व आळंदी ग्रामीण रुग्णालय अलर्ट झाले असून आवश्यक त्या उपाययोजना कार्यान्वित केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे व वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी दिली.
सध्या पावसाळ्याचे दिवस असून दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे डोळे येण्याची साथ वाढत आहे. हा आजार साथीच्या स्वरूपात असल्याने विद्यार्थ्यांनी एकत्र न येता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. आळंदीत अनेक वारकरी विद्यार्थ्यांच्या संस्था आहेत. या साथीत वारकरी विद्यार्थी जादा बाधित असल्याचे दिसून येत आहे. मात्र बाधित विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर एकमेकाशी संपर्क आल्याने इतरांचेही डोळे येण्याचे प्रमाण वाढत आहे.
आळंदी परिसरात सोमवारी ४५०, मंगळवारी ७०४, बुधवारी २१०, गुरुवारी १६०, शुक्रवारी दुपारपर्यंत १७० मुलांना या संसर्गजन्य आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. यापार्श्वभूमीवर आळंदी ग्रामीण रुग्णालयाने पुण्यातून (औंध) एनआयव्हीचे सिव्हिल सर्जन तपासणी पथक पाचारण केले असून या पथकाद्वारे बाधित मुलांची तपासणी करून त्यावर उपचार केले जात आहेत. आळंदी ग्रामीण रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सोमवारच्या तुलनेत ही आकडेवारी घटू लागली आहे. साथ आटोक्यात आणण्यासाठी खेड तालुका आरोग्य विभाग सतर्क आहे.
शिक्षण विभागाला लेखी पत्र जारी... आळंदी हद्दीतील सर्व शिक्षण संस्थांना सदर प्रकारचे रुग्ण (विद्यार्थी) शाळेत आल्यास त्याचा प्रादुर्भाव इतर विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. बाधित विद्यार्थ्यांच्या पालकांस बोलवून सदर विद्यार्थ्यास सात दिवस घरी पाठवून विलगीकरणात ठेवून योग्य ते औषध उपचार घेण्याच्या सूचना आपल्या स्तरावर देण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र आळंदी ग्रामीण रुग्णालयाने गटशिक्षणाधिकारी, नगरपालिका प्रशासनाला पाठवले आहे.
डोळे आल्याची लक्षणे आढळून आल्यास वेळीच नेत्रचिकित्सकांकडून डोळ्याची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे स्थानिक डॉक्टरांनी सांगितले.
साथीचा प्रसार कसा होतो : या साथीचे संक्रमण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे - डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, चष्मा, सौंदर्यप्रसाधने याचा वापर केल्याने होतो.
आजाराची लक्षणे : डोळ्यांची जळजळ होणे - डोळे दुखणे- डोळ्यातून सतत पाणी येणे - पापण्या चिकटणे - डोळ्यांना प्रकाश सहन न होणे.
डोळे आल्यास काय करावे : डोळ्यांची स्वच्छता राखावी - डोळ्यांना हात लावल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत - डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना चष्मा वापरावा - आपला रुमाल, चष्मा, आयड्रॉप्स अथवा इतर वस्तू इतरांना वापरण्यास देऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार घ्यावेत. लहान मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे.
खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात खबरदारी म्हणून शाळा, आश्रमशाळा व अंगणवाडीतील मुलांचा सर्व्हे करून तपासणी केली जात आहे. विशेषतः आळंदीत दहा पथके तैनात करण्यात आली आहेत. शुक्रवारी आळंदी व्यतिरिक्त तालुक्यातील ३ हजार ३४५ विद्यार्थी तपासले असून त्यापैकी २५ जण डोळे आलेले आढळुन आले. सर्वांवर उपचार करून त्यांचे घरी विलगीकरण करण्यात आले आहे. - डॉ. इंदिरा पारखे, खेड तालुका आरोग्य अधिकारी.
डोळ्यांच्या साथीचे रुग्ण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. मात्र शालेय वयातील मुलांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यासाठी आम्ही स्वतंत्र ओपीडी ठेवली आहे. सर्व मुलांना केस पेपर फ्री केले आहेत. संबंधित संस्था प्रमुखांनी बाधित विद्यार्थ्यांना आठ दिवस शाळेतून घरी ठेवण्याच्या सूचना कराव्यात. जेणेकरून संसर्ग वाढणार नाही.- डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधीक्षक आळंदी ग्रामीण रुग्णालय.