लोकमत आॅनलाईन
कोल्हापूर, दि. २९ : अज्ञान मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दिलेली मोटारसायकल त्यांची जीवघेणी ठरत आहे. बेफिकीर पालकही त्यांना आवर घालण्याचा प्रयत्न करत नसल्याचे दिसून येत आहे. या मुलांच्या ‘धूम स्टाईल’च्या हौसेपुढे पादचारी नागरिकांच्या जिवालाही धोका पोहोचत आहे. अठरा वर्षांखालील मुले गाडी चालविताना मिळाल्यास दंड होईलचं. त्याशिवाय त्यांच्याकडून कोणास दूखापत होवून मृत्यू झाल्यास पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश परिक्षेत्रातील पोलिस अधीक्षकांना दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी शनिवारी दिली.
दरम्यान परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० हजार ३७९ वाहनांवर कारवाई करुन १ कोटी १० लाख ३१ हजार १२० रुपये दंड वसुल केला. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी पोलिस प्रशासनाने दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसांत ही मोहिम राबवली आहे. प्रत्येक आठवड्यातील दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे.
वाहनांची संख्या वाढल्याने पाचही जिल्ह्यातील शहरासह इतर पर्यटनस्थळी वाहतुकीची कोंडी होत आहे. काही वाहनधारक नियमबाह्य वाहने चालवून वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले होते. पाच जिल्ह्यातील वाहतुक समस्येचा आढावा स्वत: सायकल वरुन फिरुन घेतला. गेल्या वतीन वर्षात अपघाती मृतांची संख्या जास्त आहे. अपघात होऊ नयेत, नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्यात मोटर व्हेईकल अॅक्टनुसार नियमबाह्य वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश १४३ पोलिस ठाण्यांना दिले.
दि. १७ ते १८ व २४ ते २५ एप्रिल या चार दिवसात सकाळी नऊच्या सुमारास पोलिस रस्त्यावर उतरले. चौका-चौकांत प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहने तपासली गेली. यावेळी परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी लेन मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, तिब्बल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट, मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली.
कागदपत्रांची पाहणी करून नियमबाह्य आढळणाऱ्या वाहनचालकांना जाग्यावर २०० ते ५०० रुपये दंडाची पावती दिली गेली. बहुतांशी पाच जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसणाऱ्यांवर कारवाई झाली. ही कारवाई येथून पुढे आठवड्यातील कोणत्याही दोन दिवस निवडून केली जाणार आहे. परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्यांत वाहनांची रहदारी वाढल्यामुळे अनेक मार्गांवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. शासकीय कर्मचारी असो, किंवा महाविद्यालयीन तरुण वाहन चालविताना मोबाईलवर बोलत जाणे ही त्यांची ‘स्टाईल’च बनली आहे. त्याचा परिणाम म्हणून अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.अज्ञान मुलांच्या हातात दूचाकी देवून अनेक पादचाऱ्यांचे जिव धोक्यात आले आहेत. त्यासाठी आता मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या मुलांच्या पालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.
चालकांची तपासणी पूणे-बेंगलोर महामार्गावर ट्रक चालक मद्यपान, नशेली पदार्थ घेवून वाहने चालवित असतात. त्यामुळे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथके नियुक्त करुन प्रत्येक वाहन चालविणाऱ्यांची ब्रेथ अॅनालायझर यंत्राद्वारे तपासणी केली जाणार आहे.
पाच जिल्ह्यांतील वर्षभरातील अपघाती मृतांची संखा
२०१५-२७८८
२०१६-२८३०
२०१७-६३९ (३१ मार्च अखेर)
जिल्हा केसेस दंड
कोल्हापूर १२०३१ २४४८०००
सांगली ८५१५ १७२४१००
सातारा ७०३१ १५९५६००
सोलापूर ग्रामीण ९२०४ १६१२९२०
पुणे ग्रामीण १३५९८ ३६५०५००