पुणे : माहेरहून हुंडा आणावा म्हणून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुजाता राजकुमार बागळे (वय २८, रा. भेकराईनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सुजाता ही शहरातील एका नामांकित रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करत होती.
याप्रकरणी विवाहितेचे वडील अंकुश शंकर वर्षे वय ५५, रा. मंगरूळ, ता. कळंब) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती राजकुमार बाळगे (वय २८), नणंद रविता केशव वर्पे (वय ३५), वर्षा संतोष घुमरे (वय ३१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. ही २६ फेब्रुवारी २०१९ ते १२ मार्च २०२२ दरम्यान भेकराईनगर फुरसुंगी परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सुजाता ही लग्न झाल्यापासून सासरी नांदत असताना आरोपी पती राजकुमार हा त्यांना माहेरहून हुंडा आणावा म्हणून तगादा लावत होता तसेच या कारणातून सुजाता हिचा शारीरिक व मानसिक छळ करत होता तर नणंद रविता व वर्षा या देखील सतत टोचून बोलत होत्या. त्यामुळे नेहमी होणाऱ्या त्रासाला कंटाळून १२ मार्चला सुजाता हिने भेकराईनगर फुरसुंगी येथील राहत्या घरी साडेबाराच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे करीत आहेत.