अभिजीत डुंगरवाल
पुणे : पीएमपीएल वाहन चालकाच्या हलगर्जीपणामुळे आज सकाळी साडे सातच्या सुमारास “विनाचालक पीएमटीचा थरार” हजारो कात्रजकरांनी अनुभवला.या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून,मात्र दोन रिक्षा चालक या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. ही घटना इतकी भयानक होती की सांगणाऱ्यांचाही थरथर काप होत होता. या विषयी अधिकमाहिती अशी की, सकाळी साडे सातची वेळ नेहमीप्रमाणे कात्रज चौकात विद्यार्थी,भाजीवाले,नोकरदार यांची मोठी वर्दळ होती. कात्रज पीएमटी डेपोतून ट्रँव्हल टाईम या ठेकेदार कंपनीची बस क्रमांक आर २८३, एम एच १४ सी डब्लू,१७४४ ही बस कात्रज ते हौसीग बोर्ड या मार्गाने जाण्यासाठी स्वारगेटच्या दिशेने तोंड करून उतारावर लावण्यात आली होती. या बसचा चालक पिराजी दिवटे हा वाहकाला बोलवण्यासाठी गाडी मोकळी सोडुन खाली उतरला. सुदैवाने कोणीही प्रवासी बसमध्ये बसलेले नव्हते. ही बस ब्रेक न लागल्यामुळे दत्तनगरकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या बाळासाहेब महारनवर यांच्या रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू ई ७८३७ व जावेद बेडगे यांच्या रिक्षा क्रमांक एम एच १२ क्यू ई ७९४० वर जाऊन आदळली यात हे दोघेही जखमी झाले आहेत.व त्यांच्या रिक्षाचेही नुकसान झाले आहे. पुढे ही बस या रिक्षांना धडकून कात्रज मुख्य चौकाकडे जाऊ लागली,प्रचंड आरडाओरडा होत असल्याने नागरीकांनी आपले जीव वाचवत तेथून पळ काढला,अनेक रिक्षावाल्यांनी आपल्या रिक्षा या बसच्या मार्गातून हटवल्या.बाजूलाच चहा पित असलेल्या दिगंबर कोराळे (रा.अय्यपा मंदीर जवळ,कात्रज) या टॅक्सी ड्रायव्हरने आपल्या जीवाची पर्वा न करता पाठीमागच्या दारातून धावत्या पीएमटीमध्ये प्रवेश केला. तोपर्यत उतार असल्यामुळे पीएमटी मुंबई बायपास चौकापर्यंत पोहचली होती. पुढे ती सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांना आदळणार तो पर्यत या युवकाने ब्रेक दाबून गाडी थांबवली. या युवकाच्या साहसामुळे अनेकांचे प्राण वाचले मात्र,ज्या ठेकेदाराची ही नादुरुस्त पीएमटी आहे व जो चालक या घटनेला जबाबदार आहे, त्यांच्यावर भारती विद्यापीठ पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे औस्तुक्याचे आहे.