पुणे : महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ॲॅमेनिटी स्पेसवर अतिक्रमणे होत आहेत, त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे शक्य नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनानेच आता एका ॲॅमेनिटी स्पेसवर पार्किंग उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ॲॅमेनिटी स्पेसच्या जागांच्या संरक्षणाचा प्रश्न अशा रीतीनेही सुटू शकतो, याचे उत्तम उदाहरण महापालिका प्रशासनानेच दाखवून दिले आहे़
महापालिकेच्या वतीने वडगाव शेरी येथील पुण्यनगरी सोसायटीच्या ॲॅमेनिटी स्पेसमध्ये पार्किंग उभारण्यात येत आहे. येथे एकमजली पार्किंग उभारण्यात येणार असून, यामध्ये ३० चारचाकी व १२० दुचाकी पार्क करता येणार आहेत, तसेच याठिकाणी आणखी दोन मजले वाढविता येणेही शक्य आहे. वडगाव शेरीसह कोंढवा परिसरातील इस्कॉन मंदिराच्या शेजारी पाचमजली पार्किंग उभारण्यात येणार आहे. यामध्ये एकावेळी १७० चारचाकी वाहने पार्क केली जाऊ शकणार आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
---------------------
सर्वच ॲमेनिटी स्पेसवर पार्किंग उभारा
शहरात महापालिकेच्या ताब्यात शेकडो हेक्टर जागा ॲमेनिटी स्पेसच्या माध्यमातून आली आहे. यापैकी काही ठिकाणी अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या जागांचा योग्य वापर व्हावा, तेथे अतिक्रमण होऊ नये म्हणून महापालिकेने काही दिवसांपूर्वी त्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय स्वीकारला. यास स्थायी समितीमध्ये मंजुरीही मिळाली; पण शहरातील नागरिकांनी यास तीव्र विरोध केला, तसेच सत्ताधारी भाजपच्या या निर्णयामध्ये त्याच पक्षातील काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला, तर राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनेही त्याला मोठा विरोध केल्याने, हा प्रस्ताव अद्याप सर्वसाधारण सभेपुढे आणण्यात आला नाही.
दरम्यान, ॲमेनिटी स्पेसच्या संरक्षणाचाच प्रश्न असेल, तर याला उत्तम मार्ग म्हणजे महापालिकेच्या ताब्यातील ॲमेनिटी स्पेसवर पार्किंग उभारल्यास, त्यांचे संरक्षणही होईल व शहरातील अंदाधुंद पार्किंगला हक्काची जागा मिळेल. भविष्यात येथे नागरी सुविधा केंद्र उभारावयाचे झाल्यास महापालिका या पार्किंगही स्वत:च्या अधिकारात लागलीच रिक्त करू शकेल, असा मतप्रवाह शहरातील सामाजिक संस्था, संघटनांकडून व्यक्त होत आहे.