शिरूर शहरात नगर परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या दहा ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्याबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती
उद्योग आघाडी पुणे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी दिली .
शिरूर शहरातील नगर परिषद कार्यालयाजवळ अपघातात एका लहान मुलाचा व एका तरुणाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा उद्योग आघाडी पुणे जिल्हाचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांनी २२ जानेवारी रोजी उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता.
या विषयावर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षा वैशालीताई वाखारे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषदेत बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी
शिरूर तालुका भाजपा संपर्कप्रमुख बाबूराव पाचंगे, शिरूर शहर भाजपा अध्यक्ष नगरसेवक नितीन पाचर्णे, नगरसेवक मंगेश खांडरे,मुख्याधिकारी महेश रोकडे,
बांधकाम अभियंता कांचन, माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, शहर कार्याध्यक्ष मितेश गादिया, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष राजू शेख, रेश्मा शेख, विजय नरके, नवनाथ जाधव उपस्थित होते.
या बैठकीत शिरूर शहरातील वाढती वाहतूककोंडी व टपरीधारकांचे पुनर्वसन याबाबत सखोल चर्चा झाली. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पार्किंग ठिकाणे निश्चित करण्यात आल्याचे आराखडा नगर परिषदेने तयार केला असून बस स्थानकाशेजारी, बाजार समिती, कुकडी वसाहत, बी जे कॉर्नर अशा दहा ठिकाणी पार्किंग व कापड बाजार, सरदार पेठेत सम-विषम पार्किंग तयार करणे, विद्याधाम काॅर्नर, रामलिंग रोड येथे ब्लिंकर दिवे बसविणे, पादचारी मार्ग बनवणे, पाबळ फाटा ते जोशी वाडी रस्त्याचे काम सुरू करणे, बाजार समिती ते निर्मल प्लाझा रस्ता बनविणेबाबत निर्णय घेण्याची चर्चा
नगराध्यक्ष व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याबरोबर झाली असल्याची माहिती संजय पाचंगे यांनी दिली. तसेच शिरुर शहरातील टपरीधारकांच्या टप-या २०१४ साली पाडण्यात आल्या परंतु अद्याप त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही. त्याबाबत नगरपरिषद दिनांक २० जानेवारी २०२१ पासून शहरातील सर्व पथारीवाले, टपरीवाले, हातगाडीवाले व्यवसायांच्या नोंदणी करणार असून जागा निश्चित करुन सर्वांचे पुनर्वसन करणार आहे.
त्यासाठी शिरूर शहरातील सर्व पथारीवाले व्यवसायिकांनी आपली नोंदणी करावी यासाठी शिरूर शहरात माहिती फलकही लावण्यात येणार असल्याचे सांगून दोन दिवसांत यावर अंमलबजावणी करुन २२ जानेवारी रोजी पुन्हा सभागृह नेते प्रकाश धारीवाल, नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, नगरसेवक यांच्या बरोबर बैठक होणार असलयाचे पाचंगे यांनी सांगितले . तसेच आजच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दोन दिवसांत ठरलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली नाही तर २२ जानेवारीचे उपोषण आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संजय पाचंगे यांनी दिला आहे.