पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्याने अनेकांना दळणवळणासाठी अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे त्रस्त झालेले पुणेकर कर्ज काढून, लाखभर रुपये खर्च करून दुचाकी घेतात. विविध कामासाठी शहरात फिरताना दुचाकी रस्त्यालगत उभी करून कार्यालयात जातात; पण आपण पार्क केलेली गाडी सुरक्षित राहील की नाही, याची फारशी काळजी घेत नसाल तर सावधान; कारण शहरात गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
शहरात दररोज सरासरी किमान ६ वाहने चोरीला जात असल्याचे दिसून येत आहे. याउलट केवळ ३० टक्के वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येतात. त्यामुळे आपल्या वाहनाची काळजी आपण घेण्याची गरज आहे. देशातील सर्वाधिक दुचाकीचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. मात्र, आता सर्वाधिक वाहनचोरीचे गुन्हे दाखल होत असलेले शहर म्हणून पुणे शहराची बदलौकिक ओळख होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सद्य:स्थिती
- सोसायटीमध्ये पार्किंगला जागा नसल्याने अनेकजण सोसायटी, घराबाहेर वाहने पार्क करतात. अशी वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक होते. आता गर्दीच्या ठिकाणी पार्क केलेली वाहनेदेखील भरदिवसा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
- गतवर्षी शहरातून तब्बल १ हजार ५१३ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी केवळ ५२३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. हे प्रमाण केवळ ३४ टक्के इतके आहे.
- गेल्या पाच महिन्यांत मेअखेरपर्यंत ७२६ वाहने चोरीला गेली असून, त्यातील केवळ १६३ वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे प्रमाण केवळ २२ टक्के इतके आहे.
- गेल्या २२ जूनपर्यंत शहरातून एकूण ८७८ वाहने चोरीला गेली आहेत. जून महिन्यातील २२ दिवसांमध्ये तब्बल १५२ वाहने चोरीला गेली आहेत. गेल्या वर्षी जून २०२१ अखेर शहरात ६५० वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले होते. हे लक्षात घेता यावर्षी वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे.