पुणे : ‘ओ ओ.. इथे गाडी लाऊ नका, दिसत नाही का जाळी टाकलीय?, तुमची गाडी पुढे लावा’ अशा एक ना अनेक अनुभवांना सर्वसामान्य नागरिकांना मध्यवस्तीतील बाजारपेठेत सामोरे जावे लागते. ग्राहकांना दुकानांमध्ये जाण्यासाठी मार्ग मिळावा, याकरिता दुकानदारांकडून रस्त्यावर जाळ्या टाकल्या जात आहेत. त्यामुळे वाहनचालकांची अडचण होत असून सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.
मध्यवस्तीतील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई परिसर, रविवार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक खरेदीसाठी येत असतात. या नागरिकांना नेहमीच वाहतूककोंडीसह पार्किंगचा प्रश्न सतावत असतो. मध्यवर्ती पेठांमध्येच शहरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने मुळातच अरुंद आणि निमुळत्या रस्त्यांवर वाहने अस्ताव्यस्त लावल्याने वाहतूककोंडी होते. त्यातच दुकानदार दुकानांसमोर लोखंडी जाळ्या टाकून ठेवतात.
वास्तविक, दुकानांच्या समोर पदपथ आहे. पदपथ आणि रस्त्याच्या मध्ये दुभाजक बसविलेले आहेत. या दुभाजकांमध्ये जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे व्यावसायिक या लोखंडी जाळ्या टाकतात. त्यामुळे नागरिक आणि दुकानदारांमध्येही अनेकदा वाद होतात.अडचणी अन् जाळ्याजवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांवरील पदपथांवर अनधिकृत पथारी धारकांनी जागा व्यापलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणेही मुश्कील होते. त्यातच जाळ्या रस्त्यावर आल्याने अडचणींमध्ये आणखीनच भर पडत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून रस्त्यावर जाळी टाकणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जाते. रस्त्यावर जाळ्या टाकल्याचे आढळून आल्यास त्या जाळ्या जप्त केल्या जातात. मात्र, महापालिकेचे त्याविषयीचे धोरण अद्याप ठरलेले नाही. त्यासाठी धोरण ठरवावे लागेल. नागरिकांच्या अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर नक्कीच अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जाईल.- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग
दुकानदारांकडून स्वत:च्या फायद्याकरिता रस्त्यावर जाळ्या टाकल्या जातात; मात्र या जाळ्यांचा सर्व सामान्य नागरिकांना त्रास होतो. अनेकदा तर त्यामध्ये पाय अडकून पडायला होते. नागरिकांना या जाळ्यांमुळे वाहने तेथे उभी करता येत नाहीत. अनेकदा दुकानदारांशी वाद होतो. मात्र, कोणीही नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाही. याबाबत ठोस कारवाई होण्याची आवश्यकता आहे.- प्रकाश आठवले, ज्येष्ठ नागरिक, शनिवार पेठ