पुणे: शहर आणि परिसरातील एकाही मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना यापुढे कोणत्याही स्वरुपाचे पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये, असा ठराव शुक्रवारी महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत करण्यात आला. बेकायदेशीरपणे नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करणा-या सर्व मॉल, मल्टिप्लेक्सला दोन दिवसांत नोटीसा देण्याचे आदेश देखील शहर सुधारणा समितीच्या बैठकीत प्रशासनाला देण्यात आले. न्यायालयाच्या निर्णयानुसार मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना पार्किंग शुल्क आकारणे बेकायदेशीर आहे. परंतु पुणे शहर आणि परिसरातील बहुतेक सर्व मॉल, मल्टिप्लेक्समध्ये ग्राहकांची लुट केली जात असून, ५ रुपयांपासून ५० रुपये, १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारणी केली जात आहे. मॉल, मल्टिप्लेक्समध्ये येणा-या ग्राहकांना मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित व्यावस्थापकांची असते. याबाबत न्यायालयाने वेळोवेळी निर्णय दिला आहे. त्यानंतर देखील शहरातील मॉल, मल्टिप्लेक्सकडून अनधिकृतपणे पार्किंग शुल्क वसुल केले जात आहे. याबाबत महापालिकेच्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये समितीने शहरातील मॉलची संख्या व आकारण्यात येणा-या पार्किंग शुल्काची माहिती प्रशासनाकडे मागविली होती. यामध्ये महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शहर आणि परिसरामध्ये ४० हून अधिक मॉल आणि मल्टिप्लेक्स असून, यामध्ये ५ रुपयांपासून १० रुपये, ५० रुपये थेट १०० रुपयांपर्यंत पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती शुक्रवारी झालेल्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सादर करण्यात आली. यामुळे या बैठकीमध्ये नागरिकांकडून बेकायदेशीर पणे पार्किंग शुल्क आकारणी करणा-या मॉल, मल्टिप्लेक्सच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा व संबंधित सर्वांना तातडीने नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला.--------------------नागरिकांची लूट थांबविण्यासाठी प्रयत्न करणारशहरातील मॉल, मल्टिप्लेक्सकडून नागरिकांकडून बेकायदेशीरपणे पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे. याबाबत शहर सुधारण समितीत प्रचंड विरोध करण्यात आला असून, नागरिकांची होणारी पिळवणूक थांबविण्याची मागणी सर्व सदस्यांनी केली. त्यानुसार समितीच्या बैठकीत सर्व मॉल, मल्टिप्लेक्सने तातडीने पार्किंग शुल्क आकारणी बंद करण्याचा व संबंधिता नोटीसा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी समितीच्या वतीने प्रयत्न करणार आहोत.-अमोल बालवडकर, शहर सुधारणा समिती अध्यक्ष