लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ब्रिटिशकालीन भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला तयार करण्यात आलेल्या बागेची, कारंज्याची व झाडांची वाळून १० वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना फिरण्यासाठी व विश्रांती घेण्यासाठी ठिकाण नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.पाटबंधारे विभागाच्या वतीने भाटघर धरणाच्या काठावर नऱ्हे गावाच्या बाजूला बागीचा तयार करून त्यात विविध प्रकारची झाडे, वेली, फुलझाडे, कारंजे तयार करुन पर्यटकांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आली होती. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटकांना व शाळा-कॉलेजच्या सहलीला येणाऱ्या विद्यार्थांना बसण्यासाठी हक्काचे ठिकाण होते. बागेतून भाटघर धरणाच्या पाण्याचे सुंदर विहंगम चित्र दिसते. त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी असते.मात्र १० वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या बागेकडे दुर्लक्ष केल्यामुळे येथील झाडे, वेली, फुले वाळून गेली आहेत. कारंजे बंद पडले आहे. बाग म्हणून त्याचे काहीच अस्तित्व राहिलेच नाही. मोकाट जनावरे या बागेत फिरत असतात.पाटबंधारे विभागाने भाटघर धरणाच्या काठावरील बाग पुनर्जीवित करावी. यामुळे धरणावर येणाऱ्या पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्याचा फायदा पर्यायाने पाटबंधारे विभागालाच होणार आहे. मात्र ते उदासीन असल्याचे दिसते.
भाटघर धरणावरील बागेची दुरवस्था
By admin | Published: May 29, 2017 2:00 AM