पुणे : देशभरात विविध कलांचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था आणि इन्स्टिट्यूट कार्यरत आहेत. कलांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने शिक्षणपद्धतीत बदल किंवा सुधारणा करण्याची गरज आहे का? हे जाणून घेण्याकरिता शिक्षण, महिला, बाल, युवक आणि क्रीडा या विभागाच्या संसदीय समितीचे शिष्टमंडळ सध्या देश दौऱ्यावर आहे. या शिष्टमंडळाने पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला मंगळवारी (दि. ३१) भेट दिली.
संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे असून, समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्वपक्षीय २१ खासदारांचा समावेश आहे. समितीतील १२ खासदारांनी मंगळवारी एफटीआयआयमध्ये बैठक घेऊन चित्रपट शिक्षणाच्या प्रचारासाठी एफटीआयआयने काय पावले उचलली यावर चर्चा केली. या वेळी एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला, चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता संदीप शहारे, कुलसचिव सय्यद रबीहाश्मी, लेखा अधिकारी मीनल काकडे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट विभागाच्या संचालक धनप्रीत कौर यांच्यासह एफटीआयआयच्या काही माजी विद्यार्थ्यांनाही बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
संसदीय समितीने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेलाही भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष नंदू फडके आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी स्वागत केले. सर्व सदस्यांना संस्थेची माहिती देण्यात आली. शंभर वर्षे झालेल्या संस्थांना केंद्र सरकारने शंभर कोटी रुपये निधी दिला होता. भांडारकर संस्थेनेही शताब्दी साजरी केली असून शंभर कोटी रुपये निधी उपलब्ध झाला तर रामायण, महाभारत आणि बुद्ध तत्त्वज्ञान पोहोचलेल्या देशांचे केंद्र भांडारकर संस्थेत आकार घेऊ शकते, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आल्याचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी सांगितले.
--------------------------------------------------------
देशभरात आर्ट्स, कल्चरल, परफाॅर्मिंग आणि फाईन आर्ट्सचे शिक्षण दिले जाते. त्या शिक्षणात कोणकोणत्या सुधारणा करायला हव्या. त्याविषयी समिती पाहणी करून संस्थांशी चर्चा करीत आहे. त्यासंदर्भात समितीने एफटीआयआय आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेला भेट दिली. नुकतीच चेन्नईच्या कलाक्षेत्र इन्स्टिट्यूटला देखील भेट देण्यात आली असून, दोन दिवसांनी मुंबईच्या गंधर्व संगीत महाविद्यालय, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे गुरुकुल व जे.जे स्कूल आॅफ आर्ट्सला भेट देणार आहोत. या संस्थांची पाहणी करून समिती सरकारला अहवाल सादर करणार आहे.
- डॉ. विनय सहस्रबुद्धे, अध्यक्ष, संसदीय समिती
---------------------