पुणे : दोघांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. पण वैचारिक मतभेदामुळे दोघे वेगळे राहू लागले. नातेवाईक तसेच कुटुंबियांच्या मध्यस्थीनंतरही त्यांना एकत्र येण्यामध्ये उत्साह राहिला नाही. अखेर पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला.घटस्फोटाच्या प्रकरणात पती व पत्नी या दोघांनीही पोटगी, स्त्रीधन, स्थावर व जंगम मालमत्तेवरील हक्क सोडले. मात्र, पत्नीकडे असलेल्या आफ्रिकन पोपटासाठी पतीने हट्ट धरला. समुपदेशनादरम्यान पत्नीनेही पतीला पोपट सुपूर्द करण्याचे मान्य केले अन् पोपटामुळे रखडलेला घटस्फोट क्षणार्धात मंजूर झाला.
स्मिता आणि राकेश (नावे बदलेली आहेत).यांचा 11 डिसेंबर 2019 रोजी पुण्यातील विवाह निबंधक कार्यालयात लग्न झाले. संसाराचा गाडा सुरळीत सुरू असताना वैचारिक मतभेदामुळे 14 सप्टेंबर 2021 पासून वेगळे राहू लागले.स्मिताने घटस्फोट मिळावा यासाठी 9 डिसेंबर 2022 रोजी न्यायालयात अर्ज केला. यादरम्यान, त्यांना समुपदेशानासाठी पाठविण्यात आले. समुपदेशानंतरही पतीनेही घटस्फोटाची तयारी दर्शविली. त्यानंतर, स्मिताने राकेशकडून मिळणारा पोटगीचा हक्क सोडून देत त्याविरोधात दिवाणी अथवा फौजदारी दावा दाखल न करण्याचे मान्य केले. पत्नीतर्फे अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे यांनी काम पाहिले.
एकमेकांच्या स्थावर व जंगम मिळकतीवर हक्क व अधिकार सांगणार नसल्याचे सांगत एकमेकांच्या आयुष्यात हस्तक्षेप न करण्याचे दोघांनही कबूल केले. समुपदेशनानंतर पती-पत्नी घटस्फोटावर ठाम होते. यावेळी, पतीने पत्नीकडे असलेला आफ्रीकन पोपट करण्याची मागणी केली. त्यास पत्नीनेही संमती दिली. त्यानंतर विवाह समुपदेशक असलेल्या शशांक मराठे यांनी 16 नोव्हेंबर 2023 पूर्वी पोपट पतीकडे सूपूर्द करण्यात यावा असे नमूद करत संबंधित अहवाल कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांच्याकडे पाठविला. घटस्फोटाच्या अर्जास सहा महिने पुर्ण झाले होते. दोघेही एक वर्षांपेक्षा जास्त काळ विभक्त राहत असल्याने न्यायालयानेही त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जावर शिक्कामोर्तब केले.