पवनानगर: भारतीय हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुणे जिल्ह्यात कालपासून पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम आहे. घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याची शक्यता वाढल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अशातच मावळ तालुक्यातील तिकोणा (वितंगगड)किल्ल्याचा काही भाग कोसळल्याची घटना घडलीआहे. मात्र, दरड कोसळल्यानंतर सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पायथ्याशी असणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिकोणा (वितंगगड)किल्ल्याच्या पायथ्याशी तिकोणापेठ गाव वसलेले असून किल्ल्याला लागूनच गावातील वस्ती आहे. या वस्तीची लोकसंख्या ५०० पेक्षा अधिक आहे. रविवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास दरड कोसळल्याचा आवाज आल्याने तिकोणापेठ येथील अजित ज्ञानदेव मोहोळ हे घरातुन बाहेर आले. परंतु दरड छोटी असल्याने कुठलीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. गडावर जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, स्थानिकांनी अलर्ट राहणे गरजेचे असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तर या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस पाटील सरपंच, ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.