पुणे : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका विचारात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र, युवा नेते पार्थ पवार सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार गटाच्या पुणे शहरातील सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. २३) जिजाई निवासस्थानी घेतली.
पुणे शहरातील सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व सेल अध्यक्ष, युवक कार्यकारिणी, सर्व कार्याध्यक्ष व इतर युवक पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी चर्चा झाली. पुणे शहर कार्यकारिणीचा आढावा घेत येत्या काळात पक्षापुढे असलेली आव्हाने व संधी याबाबत मार्गदर्शन केले. सर्व कार्यकारिणीने एक दिलाने व एकजुटीने पक्ष वाढीसाठी काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. शहरातील सर्व सेल, कार्यकारिणी पूर्ण ताकदीनिशी, प्रभावीपणे काम करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
राज्यभरात यापुढील काळात युवक मेळावे घेणार असून, राज्यातील सर्व सेलने कामाला लागावे अशा सूचना पार्थ पवार यांनी केली. याप्रसंगी पुणे शहरातील युवक शहराध्यक्ष आणि सर्व विधानसभा अध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष, युवक कार्यकारिणीतील सर्व कार्याध्यक्ष व इतर युवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.