मावळातील लोकप्रतिनिधींना पार्थ पवारांचा इशारा; '...प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून'

By प्रमोद सरवळे | Published: November 10, 2021 08:30 PM2021-11-10T20:30:59+5:302021-11-10T20:44:08+5:30

प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे' या उल्लेखामुळे फक्त मावळातच नाही तर पुणे जिल्ह्यात याबद्दल चर्चा रंगत आहे. हा इशारा नेमका कोणाला? यावरही परिसरात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

parth pawar maval loksabha constituency shrirang barne ncp | मावळातील लोकप्रतिनिधींना पार्थ पवारांचा इशारा; '...प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून'

मावळातील लोकप्रतिनिधींना पार्थ पवारांचा इशारा; '...प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून'

Next

प्रमोद सरवळे

पुणे: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी नेते पार्थ पवार सोशल मिडीयावर सक्रिय दिसत आहेत. विविध विषयांवर ते ट्विट करत असून त्यांच्या नवीन ट्विटमुळे पवार चांगलेच चर्चेत आहेत. 'मावळातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मुख्य बाजारात विक्रीसाठी येताना अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रास होत आहे. अपघात वाढले आहेत. पवन-अंदर मावळातील अशा प्रश्नांसाठी डीपीडीसी फंडातून निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न करीत आहे. मावळातील प्रत्येक गोष्टींवर मी लक्ष ठेवून आहे, असे ट्विट पार्थ पवार (ncp parth pawar) यांनी केले आहे. 'प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे' या उल्लेखामुळे फक्त मावळातच नाही तर पुणे जिल्ह्यात याबद्दल चर्चा रंगत आहे. हा इशारा नेमका कोणाला? यावरही परिसरात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार हे मावळ या मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. शिवसेेनेच्या श्रीरंग बारणेंनी (shrirang barne) पवार यांचा त्या निवडणुकीत पराभव केला होता. मावळ मतदारसंघात पराभवाला सामोरे जावे लागले असतानाही पवार मावळ भागातील विविध प्रश्नांवर बोलताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी ट्विट करत शेतकऱ्यांना मदत मिळण्याची मागणी केली होती. त्या ट्विटमध्ये, 'अवकाळी पावसामुळे मावळ परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दोन दिवसांच्या पावसाने कापणीला आलेला भात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाद्वारे मावळातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असं पवार म्हणाले होते. 

लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पार्थ पवार राजकारणापासून काही प्रमाणात दुरावल्याची चर्चा होती. पण गेल्या काही दिवसांचा विचार केला तर पवार राज्यातील विविध विषयांवर मते मांडत आहेत. तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर परिसरातील बऱ्याच रुग्णालयातील फायर ऑडिट न झाल्याने पवार यांनी चिंताही व्यक्त केली होती. 'अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास लागलेल्या आगीची दुर्घटना दुर्दैवी असून उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात येतील, असं ट्विट करत पवार यांनी माहिती दिली होती.

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरातील काही अपवाद वगळता बरेच नेते सोशल मिडीयावर सक्रिय नाहीत. पण मागील काही दिवसांपासून पार्थ पवार मावळ परिसरातील अनेक समस्यांवर मते मांडताना दिसत आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल बोलत आहेत. पवारांचा सोशल मिडीयावरील वाढता संचार वाढत आहे. तसेच परिसरातील तरुणाईंचे प्रश्न मांडून त्यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मावळ मतदारसंघात जरी पराभव झाला असला तरी माझे  प्रत्येक गोष्टीवर मी लक्ष ठेवून आहे, असं म्हणून पवारांनी मतदारसंघातील त्यांच्या राजकीय स्पर्धकांना इशारा दिला आहे अशी चर्चा परिसरात आहे.

Web Title: parth pawar maval loksabha constituency shrirang barne ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.