बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणाची केलेली सीबीआय चौकशीची मागणी व जय श्री राम म्हणत अयोध्येतील राम मंदिराला दिलेल्या शुभेच्छा यामुळे पार्थ पवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली होती. त्यानंतर पार्थ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विसंगत भूमिकेवरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना 'पार्थ अपरिपक्व असून नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीची किंमत देत नाही'' असे सांगत त्यांना चांगलेच फटकारले होते. शरद पवार यांनी सार्वजनिकरित्या सुनावल्यानंतर पार्थ नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची देखील कुणकुण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार शनिवारी (दि. १५ ) दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचे काका श्रीनिवास पवार यांची कण्हेरी (ता.बारामती ) येथील ''अनंतारा'' या निवासस्थानी घेतलेली भेट निश्चितच महत्वपूर्ण आहे. पवार कुटुंबातील उद्भवलेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे कुटुंबीय बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यावर येणार असल्याची माहिती पुढे आली होती मात्र, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्या पार्थ यांनी एकट्यानेच शनिवारी कण्हेरी हे काकांचे निवासस्थान गाठले. तर त्यांच्याआधी शुक्रवारी (दि.१४) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार भेटून गेले आहेत. परंतु, या सर्व घडामोडींवर बोलताना त्यांच्या शर्मिला पवार यांनी पार्थ हे नेहमीप्रमाणे जेवायला येणार असल्याचे पत्रकारांना सांगितले .
दरम्यान, पार्थ शनिवारी दुपारी एकटेच बारामती येथील श्रीनिवास पवार यांच्या निवास्थानी पोहचले. त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला. अजित पवार यांच्या राजकीय जीवनात त्यांचे काका शरद पवार यांची भुमिका महत्वाची मानली जाते .त्याचप्रमाणे पार्थ यांचे काका श्रीनिवास पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार का याची उत्सुकता सर्वांनाच आहे .विधानसभा निवडणूक काळात अजित पवार ' नॉट रिचेबल ' होते .त्यावेळी देखील त्यांचे बंधू श्रीनिवास यांच्या मुंबई येथील निवासस्थानी ते होते .त्यामुळे आज पार्थ यांनी त्यांच्या काकांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.----------------------------...' पार्थ ' यांच्यासाठी सोशल मीडियावर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्ते भिडले राष्ट्रवादीच्या बालेकिल्लयात कार्यकर्त्यांनी पवार कुटुंब एकसंध असल्याचे उत्तर कार्यकर्त्यांनी दिले आहे .सोशल मीडियावर त्यासाठी हे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते पार्थ पवार यांच्यासाठी सोशल मीडियावर एकमेकांना भिडले आहेत .पार्थ यांच्याबाबत कधी नव्हे एवढ्या प्रथम भाजप कार्यकर्ते येथे सोशल मिडियावर सक्रिय झालेले दिसून येतात .त्यासाठी लोकसभा निवडणूकीचे पार्थ यांचे संदर्भ वापरले जात आहेत .