बारामती (पुणे) : खासदार सुप्रिया सुळे यांचा ५२ दिवसांनी बारामतीचा दौरा पार पडला. या दौऱ्यात अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत ‘हम साथ साथ है’चा संदेश दिला. मतभेद असले, तरी मनोभेद नसल्याचे यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. राष्ट्रवादीत वेगळा गट घेऊन बाहेर पडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेनंतर बारामतीत वेगळे चित्र निर्माण झाले. बहुतांश राष्ट्रवादीचे पदाधिकारी, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली.
‘अजितदादा’सांगतील ते धोरण, ते बांधतील ते तोरण अशी भूमिका सर्वांनी घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नुकत्याच पार पडलेल्या दौऱ्यातदेखील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविली. मात्र, आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वनिता बनकर, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. आज सुळे यांनी आजच्या दौऱ्यात मोता कुटुंबिय, माजी नगरसेवक संजय संघवी यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी खासदार सुळे यांनी रेल्वेच्या सर्व्हिस रस्त्याची पाहणी केली. येथील रेल्वेच्या जागेतील सर्व्हिस रोडमुळे शहरातील शेकडो नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे. सर्व्हिस रस्ता रेल्वेच्या जागेतून जाणार असल्याने त्यासाठी रेल्वे खात्याने बारामती नगर परिषदेकडे ७ कोटी ३२ लाख रुपयांची मागणी केली होती. ती जास्त असल्यामुळे अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुळे यांचा रेल्वे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. रेल्वे विभागाने सार्वजनिक कामांसाठीचा सहा टक्के दर हा दीड टक्क्यावर आणला. त्यामुळे सर्व्हिस रोडसाठी लागणारी रक्कम १ कोटी ३१ हजार ४४० रुपयांपर्यंत कमी झाली. त्यानुसार बारामती नगर परिषदेने ही रक्कम रेल्वे विभागाकडे जमा केल्यानंतर आता रस्त्याचे काम सुरू झाले आहे. त्याची सुळे यांनी पाहणी केली. यावेळी सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे विभागाचे सुळे यांनी आभार मानले.
अजित पवार यांनी साथ सोडल्याने एकाकी पडल्याच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या, लोक माझ्यासोबत आहेत अन् राहतील. बारामती हे माझे माहेर आहे आणि कर्मभूमी. माझे इथले राजकारण हे समाजकारण आहे. मी राष्ट्रवादीकडे फक्त लोकसभेचेच तिकीट आजवर मागितले आहे. सेवा, शेतकऱ्यांचा सन्मान व महाराष्ट्राचा स्वाभिमान या तीन कारणांसाठी मी राजकारणात आले आहे. सेवक म्हणून मला जनतेने १५ वर्षे संधी दिली. मी त्यांची आयुष्यभर ऋणी राहिल. या भागासह राज्यातील कामांचा पाठपुरावा दिल्लीत करणे हे माझे काम आहे. तुम्ही माझी संसदेतील कामगिरी बघत असता. तेथे बारामती लोकसभा मतदार संघाची आण, बाण आणि शान पहिल्या क्रमांकावर राहिल, यासाठी माझा प्रयत्न असेल,असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.