जिथे विद्यमान आमदार आहेत, तिथे ज्याची सीट त्याला मिळाली. त्यामुळे हे उपकार नाहीत, तो हक्क आहे. हे सगळं उभं करताना दिवसरात्र स्ट्रगल करावा लागतो, असं ठाम मत शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केलं.
अर्थात, पक्षप्रमुखांचे आशीर्वाद नक्कीच आहेत, कारण कुणाला तिकीट द्यायचं याचा अधिकार त्यांना आहे आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, असंही त्यांनी आवर्जून नमूद केलं आणि उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.
पुणे शहरातील आठही मतदारसंघात विद्यमान आमदार असल्याचं कारण देत भाजपने आठही जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नव्हे तर, भाजपच्या पहिल्याच यादीत आठही जागांसाठीचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे काही नाराज शिवसैनिकांनी थेट 'मातोश्री'वर धाव घेतली आहे. आता यावर उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेतात याकडे पुण्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत पुरंदर विधानसभा मतदारसंघासाठी शिवतारे यांचे नाव आहे. त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
याचे उत्तर देताना शिवतारे म्हणाले की, 'सर्व विद्यमान आमदारांना यावेळी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. मलाही उमेदवारी देताना उपकार केले नाहीत तर मी कष्ट केले आहेत. तो माझा हक्क आहे. मात्र, पक्षप्रमुखांचे आशीर्वाद नक्कीच आहेत.'